ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 25 :- “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मराठी साहित्य, सामाजिक आणि पर्यावरण चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे.
भारतीय संस्कृती आणि संत साहित्याचा गाढा अभ्यास असलेल्या ख्रिस्ती धर्मगुरु फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी समाजात एकता, बंधुता, शांतता, सामाजिक सलोखा रहावा यासाठी व्याख्यानांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम केले. ‘सुवार्ता’ साप्ताहिकाच्या माध्यमातून पर्यावरण, नागरी, सामाजिक प्रश्न प्रभावीपणे हाताळले. हरित वसई चळवळीसाठी त्यांनी तळमळीने केलेले काम सदैव लक्षात राहील. त्यांच्या निधनानं पर्यावरणवादी विचारांचा कृतीशील साहित्यिक आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि अनुयायांच्या दुःखात सहभागी आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.