स्वीप उपक्रमांतर्गत फेसबुकच्या माध्यमातून ‘मतदानावर बोलू काही’ लाईव्ह शो अमरावती जिल्ह्यात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग
Summary
अमरावती, दि. 1 (जिमाका): जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून स्वीप उपक्रमांतर्गत ‘मतदानावर बोलू काही’ हा फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य […]
अमरावती, दि. 1 (जिमाका): जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून स्वीप उपक्रमांतर्गत ‘मतदानावर बोलू काही’ हा फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मनपा आयुक्त देविदास पवार, स्वीपचे सहायक नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके हे सहभागी होऊन त्यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
फेसबुक लाईव्ह शोच्या माध्यमातून सर्व मतदारांपर्यंत पोहोचता येते. फेसबुक आणि झूम लिंक या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. याला गावागावातून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. गावातील महिला, युवक-युवती, नागरिक यांनी शाळा, मंदिर, सावलीचे ठिकाणी ज्या ठिकाणी नेटवर्क असेल अशी जागा येथे बसून जिल्हाधिकारी यांच्या लाईव्ह शो मोठ्या उत्सुकतेने बघितला. या शोमध्ये पद्मश्री शंकरबाबा पापळकर,कोन बनेगा करोडपती विजेती बबिता ताडे त्याचबरोबर काही ज्येष्ठ नागरिकांनीही जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला आणि जिल्ह्यातील नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन केले.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी नागरिकांनी आपल्या मनात कोणतीही भीती न बाळगता किंवा कोणाच्याही दबावात न येता निर्भीडपणे मतदान करावे, असे आवाहन यावेळी केले. फेसबुक लाईव्ह शोच्या माध्यमातून डॉ. घोडके यांनी नागरिकांना मतदानांशी संबंधित प्रश्न विचारून मतदान प्रक्रियाबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करून असाच उत्साह मतदानाच्या दिवशी दाखवावा, असे आवाहन सर्व नागरिकांना केले. शोच्या यशस्वी आयोजनासाठी संजय राठी, नितीन माहुरे, गजानन कोरडे, हेमंत कुमार यावले, श्रीकांत सदाफळे, विजय काळे यांनी परिश्रम घेतले.
00000