जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा ‘त्वरित कृती’ व ‘जलद प्रतिसाद’ तत्वानुसार गतीने काम करण्याच्या सूचना
Summary
गडचिरोली, (जिमाका) दि.17: भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निवडणूक प्लॅनर प्रमाणे आतापर्यंत पार पडलेल्या प्रक्रियेची माहिती तसेच पुढील नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी लोकसभा मतदार संघातील सहाही सहाय्यक निवडणूक अधिकारी व समन्वय अधिकाऱ्यांकडून आज घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील […]
गडचिरोली, (जिमाका) दि.17: भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निवडणूक प्लॅनर प्रमाणे आतापर्यंत पार पडलेल्या प्रक्रियेची माहिती तसेच पुढील नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी लोकसभा मतदार संघातील सहाही सहाय्यक निवडणूक अधिकारी व समन्वय अधिकाऱ्यांकडून आज घेतला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना (गडचिरोली), मानसी (देसाईगंज) आदित्य जीवने (अहेरी), उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे (चिमूर) संदीप भस्के (ब्रह्मपुरी) कविता गायकवाड (देवरी) डॉ. रवींद्र होळी (आमगाव), विवेक साळुंखे (कुरखेडा), सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, मुख्य लेखा वित्त अधिकारी हेमंत ठाकूर तसेच सर्व तहसीलदार उपस्थित होते
जिल्हाधिकारी यांनी ‘त्वरित कृती’ व ‘जलद प्रतिसाद’ या दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून टिमवर्क व सर्वांच्या अनुभवाचा लाभ घेत काम करण्याच्या सूचना दिल्या. निवडणूक कालावधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये व कोणत्याही बाबीसाठी 24 तास उपलब्ध राहण्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक प्रक्रियेत विविध बाबीसाठी परवानगी देताना सर्व उमेदवारांना समान न्याय मिळेल या दृष्टीने निर्णय घ्यावा. मतदान पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना द्यावयाच्या एकूण तीन प्रशिक्षणासाठी नियोजित तारखा ठरवण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच निवडणूक साहित्याचे हस्तांतरण, टपाल मतपत्रिकेचे वाटप, निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांना द्यावयाच्या विविध परवानग्या, मतदान केंद्र व ईव्हीएम सुरक्षा कक्षाची सज्जता, निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त तक्रारींचे निराकरण, 85 वर्षांवरील जेष्ठ मतदार, दिव्यांग मतदार, अत्यावश्यक सेवेतील मतदार, निवडणूक कर्तव्यावर नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना मतदान करण्यासाठी टपाली मतपत्रिका वितरणाचे नियोजन, निवडणूक उमेदवारांचे प्रचाराचे चित्रिकरण करण्यासाठी व्हिडिओ ग्राफरचे प्रशिक्षण, वाहनाचे नियोजन, निवडणूक निरीक्षक तसेच मतदान पथकातील अधिकारी यांना मतदान केंद्र व प्रशिक्षण केंद्र येथे उपलब्ध करावयाची सुविधा, मतदानाची टक्केवारी 75 टक्के पेक्षा अधिक साध्य करण्याबाबत नियोजन आदी बाबींचा यावेळी आढावा घेण्यात आला.