धार्मिक महाराष्ट्र हेडलाइन

महाराष्ट्रात दुसऱ्यांदा होणार राष्ट्रीय युवा महोत्सव मंत्रभूमीत रंगणार युवकांच्या कला – कौशल्याचा जागर युवा महोत्सवानिमित्त विशेष लेख

Summary

‘उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका, जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही’, हा संदेश स्वामी विवेकानंद यांनी युवकांना दिला आहे. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्श झालेल्या नाशिकमध्ये युवा महोत्सवांच्या आयोजनाची संधी राज्याला मिळाली आहे. अशा या नगरीत देशभरातील युवकांचे उत्स्फूर्त स्वागत […]

‘उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका, जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही’, हा संदेश स्वामी विवेकानंद यांनी युवकांना दिला आहे. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्श झालेल्या नाशिकमध्ये युवा महोत्सवांच्या आयोजनाची संधी राज्याला मिळाली आहे. अशा या नगरीत देशभरातील युवकांचे उत्स्फूर्त स्वागत केले जाणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. स्वामी विवेकानंद हे समाजसुधारक आणि ज्यांच्या विचारातून लोकांमध्ये क्रांती घडली आहे. त्यांचे विचार आजही सर्व युवकांना प्रेरणा व प्रोत्साहन देत आहेत. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून कला, साहित्य, तंत्रज्ञान, विज्ञान, संस्कृती यांचा अनोखा अनुभव नाशिककरांना घेता येणार आहे.

देशातील युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी देशात राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. केंद्र सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालयातर्फे २७वा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवण्यात आली आहे. ही एक मोठी संधी महाराष्ट्राला मिळाली आहे. या महोत्सवाचे १२ जानेवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक येथे उद्घाटन होणार आहे.

१२ जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून सुरू होणारा आठवडा राष्ट्रीय युवा सप्ताह म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय युवा सप्ताह उत्सवाचा एक भाग म्हणून, भारत सरकार दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करते. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा हा कार्यक्रम आहे. दरवर्षी एका राज्यामध्ये संयुक्त उपक्रम साजरे केले जातात. राष्ट्रीय एकात्मता, सांप्रदायिक सौहार्दाची भावना, बंधुता, धैर्य आणि साहस या संकल्पनेचा प्रसार करून त्यांच्या सांस्कृतिक पराक्रमाचे प्रदर्शन एका सामायिक व्यासपीठावर करणे हा युवा महोत्सवाचा उद्देश आहे. देशभरातील तरुणांचे मेळावे आयोजित करून आणि त्यांना विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करून  राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा केला जातो.

२७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथील तपोवन मैदानावर १२ ते १६ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशामधील ८ हजार युवक सहभागी होणार आहेत.          युवकांचा सर्वांगिण विकास, संस्कृती आणि परंपरांचे जतन, युवकांच्या सुप्त गुणांना वाव देणे, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे या उद्देशाने राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील युवांचा चमू, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र संघटना यांचे स्वयंसेवक, परीक्षक, अधिकारी, कर्मचारी असे एकूण आठ हजार जण महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

भारत सरकारने १९८४ मध्ये हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून जाहीर केला. १९८५ पासून दरवर्षी १२ जानेवारी रोजी देशात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. यामध्ये स्वामी विवेकानंदांची भाषणे, त्यांची शिकवण, प्रबोधन, देशप्रेम याविषयी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. असे कार्यक्रम तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहेत.

नाशिकला होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @२०४७’  संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळेल. नाशिक येथे होणाऱ्या महोत्सवासाठी महाराष्ट्राचा ‘शेकरू’ हा राज्य प्राणी शुभंकर म्हणून निवडण्यात आले आहे. महाराष्ट्राचा शेकरू हा दिमाखदार राज्याचे वैशिष्ट्ये सर्वांसमोर प्रथमच अशा स्वरुपात येत आहे. शेकरू हा शांतता, मैत्री, गतिशीलता आणि पर्यावरण प्रेमाचे प्रतिक आहे. त्यातूनही युवकांना प्रेरणा मिळेल. ‘युवा के लिए – युवा द्वारा’ हे बोधवाक्य आहे, तर महाराष्ट्रासाठी ‘सशक्त युवा- समर्थ भारत’ हे घोषवाक्य आहे.

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत’  साकार करण्याची प्रेरणा मिळणार आहे. या महोत्सवाचे १२ जानेवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राला जी-२० नंतर पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी मिळणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हा राष्ट्रीय युवा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली आहे. महाराष्ट्राची संस्कृती व कला परंपरा या महोत्सवातून देशभर पोहोचवता येणार आहे. १६ वर्षांनंतर महाराष्ट्राला या युवा महोत्सवाच्या आय़ोजनाचं यजमानपद मिळाले आहे. यात जास्तीत युवक सहभागी होतील. हा महोत्सव उद्घाटनापासून ते समारोपर्यंत दिमाखदार होईल, असे नियोजन करण्यात येत आहे. – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

महोत्सवाच्या आयोजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तर समिती, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तर कार्यकारी समिती, नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती, तर क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे.

महोत्सवादरम्यान आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये स्पर्धात्मक आणि गैर-स्पर्धात्मक सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन, बौद्धिक प्रवचन, युवा कलाकारांची शिबिरे, चर्चासत्रे आणि साहसी कार्यक्रम यांचा समावेश असणार आहे. राष्ट्रीय युवा पुरस्कारही  दिले जाणार आहेत.

राष्ट्रीय युवा महोत्सवाप्रमाणे, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि ब्लॉक स्तरावरील युवा महोत्सव राष्ट्रीय युवा महोत्सवाप्रमाणेच आयोजित करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाते. उत्सवाचे केंद्र सांस्कृतिक पैलूंवर आणि इतर अनेक कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करते ज्यामध्ये विविध प्रकारच्या क्रियाकलापांचा समावेश होतो, जे केवळ मैत्रीची भावनाच नव्हे तर शांतता आणि विकास देखील दर्शवते. या सर्वांशिवाय, हा उत्सव तरुणांना त्यांच्या सांस्कृतिक प्रतिभा उंचावण्यासाठी आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *