ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभारामुळे गावकरी त्रस्त वरठी येथे चार दिवसांपासून पाण्याची टंचाई
Summary
प्रतिनिधी मोहाडी:- तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वरठी गावात तीन दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा ठणठणात आहे. गावात करोडोची शुद्ध पाण्याची नळ योजना असून नियोजन अभावी गावकरी पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. वरठी येथील शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या फिल्टर प्लांटची जर्जर अवस्था […]

प्रतिनिधी मोहाडी:- तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वरठी गावात तीन दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा ठणठणात आहे. गावात करोडोची शुद्ध पाण्याची नळ योजना असून नियोजन अभावी गावकरी पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. वरठी येथील शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या फिल्टर प्लांटची जर्जर अवस्था झाली आहे. गावात अनेक ठिकाणी पाईप लीक आहेत. पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तीनही मोटारी बंद पडल्या आहेत. एकंदरीत ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभाराचे भोग वरठी ग्रामवासी भोगत आहेत.
वरठी ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास १९००० लोक असतील. सर्वात मोठे गाव आहे. येथे जल प्राधिकरण योजनेअंतर्गत जवळपास वीस वर्षांपूर्वी जवळपास तीन कोटीची शुद्ध पिण्याच्या पाण्याची नळ योजना गावात सुरू करण्यात आली. शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजनेची सहा लक्ष ५० हजार एवढी क्षमता आहे. तेव्हा गावकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा होत आहे. प्रत्येक मशीनरीला देखरेख व मेंटेनन्स ची गरज असते. मात्र मागील काही काळापासून सदर फिल्टर प्लांटची दुरावस्था झाली आहे. गावात अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे. कधी मोटर बंद तर कधी पाईप फुटतो. त्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद होणे ही नित्याची बाब झाली आहे. ग्रामपंचायत मध्ये या आधी असलेल्या सत्ताधिकार्यांनी तसेच प्रशासकाच्या एक वर्षाच्या कार्यकाळात याकडे कुठलेच लक्ष दिले गेले नाही. यामुळे त्यांची दुरावस्था पाहावायास मिळते. मागील तीन दिवसापासून वरठी येथे गावकऱ्याची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. फिल्टर प्लांट जवळून तीन ठिकाणी पाईप फुटले. शिवाय पाणीपुरवठा करणारी मोटार बंद पडली. यामुळे मागील तीन दिवसापासून वरठी येथे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीसमोर आरो प्लांट सुरू केला आहे. मात्र यातून पाणी आणणे सर्वांसाठी शक्य नाही. पिण्याच्या पाण्याबाबत सरपंच चांगदेव रघुते व ग्रामपंचायत ने आता तरी योग्य नियोजन करण्याची मागणी वरठी यांनी केली आहे.
सीसीटीव्ही बंद
वरठी येथील नळ योजनेत खमाटा येथून वैनगंगा नदी मधून गावच्या फिल्टर प्लांटमध्ये पाणी येतो. फिल्टर प्लांटमध्ये देखरेखी साठी किंवा असामाजिक तत्वांचा शिरकाव टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र केवळ बोर्ड नसल्याने मागील अनेक महिन्यांपासून सीसीटीव्ही बंद अवस्थेत दिसून येतो. अशावेळी नळाच्या पाण्यात एखाद्याने घातपात केल्यास गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. फ्युज डायरेक्ट फिल्टर प्लांट मधून गावात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वेगवेगळ्या मोटार साठी स्टार्टर लावण्यात आले आहेत. या प्रत्येक स्टार्टर्स जवळ ओवरलोड विद्युत पुरवठ्याच्या बचावासाठी फ्युज लावलेला असतो. जेणेकरून अतिरिक्त विद्युत पुरवठा झाल्यास फ्युज उडतो. मात्र फिल्टर प्लांट मध्ये अनेक फ्यूज हे डायरेक्ट लावले असल्याने प्रत्येक विद्युत पुरवठा झाल्यास किंवा शॉर्टसर्किट झाल्यास आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तिनही मोटारी बंद
खमाटा येथील वैनगंगा नदीवर पाणीपुरवठा करणारी विहीर बनविण्यात आली आहे येथून मोटरच्या माध्यमातून वरठी येथे फिल्टर प्लांट मध्ये पाणी येत असतो. पाण्याचा पुरवठा सातत्याने व्हावा यासाठी या ठिकाणी तीन मोटरीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे मागील प्रत्येक महिन्यापासून दोन मोटारी बंद अवस्थेत आहेत. तर सुरू असलेली तिसरी मोटारही दोन दिवसांपूर्वी बंद झाली. यावरून ग्रामपंचायतीचे नियोजन शून्य कारभार दिसून येते.
सरपंचाचा पुढाकार
खमाटा येथील तीनही बंद मोटार व फिल्टर प्लांटची जर्जर अवस्था पाहून नवनिर्वाचित सरपंच चांगदेव रघुते यांनी खंत व्यक्त केली. शिवाय पुढाकार घेऊन सरपंच चांगदेव रघुते यांनी ठिकठिकाणी फुटलेल्या पाईप लाईनची दुरुस्ती करून घेतली. अनेक ठिकाणी लोखंडी पाईप फुटल्याने वेल्डरला बोलावून लोखंडी पत्रा लावून डागडुजी करून घेतली. शिवाय बंद पडलेल्या तीनही मोटर दुरुस्तीला पाठविल्याची माहिती आहे.