कृषि महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

भ्रूण प्रत्यारोपण सेवा आता थेट शेतकऱ्यांच्या दारी – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

Summary

विशेष वृत्त मुंबई, दि. ६ : उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी आणि म्हशींची स्त्री बीजे प्रयोगशाळेत फलित करुन सर्वसाधारण गायी आणि म्हशींमध्ये भ्रूण प्रत्यारोपणाची सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात प्रायोगिक तत्वावर सहा भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळांची स्थापना करण्यात […]

विशेष वृत्त

मुंबई, दि. ६ : उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी आणि म्हशींची स्त्री बीजे प्रयोगशाळेत फलित करुन सर्वसाधारण गायी आणि म्हशींमध्ये भ्रूण प्रत्यारोपणाची सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात प्रायोगिक तत्वावर सहा भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली आहे. देशी गायी आणि म्हशींचे जतन व संवर्धन करण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून हा महत्वाकांक्षी निर्णय घेतल्याची माहिती  पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दृष्टीने विविध योजना राबविल्या जात असतानाच राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आता पशुपालकांना दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने गायी आणि म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रत्येक महसुली विभागात एक अशा एकूण सहा भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक आणि अमरावती यांचा समावेश आहे. तसेच या प्रयोगशाळेतून मोबाईल वाहनाच्या माध्यमातून ही सेवा थेट शेतकऱ्यांच्या घरांपर्यंत देण्यात येणार आहे.

एका उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी आणि म्हशींपासून ५० ते ६० उच्च उत्पादन क्षमता असणारी वासरे उपलब्ध होतील. या तंत्रज्ञानाचा अचूक वापर करून उच्च दूध उत्पादन व प्रजनन अनुवांशिकता असलेल्या निवडक देशी जातींच्या गायी आणि म्हशींचे प्रजनन करून त्यांचा प्रसार होण्यास मदत होईल. तसेच नामशेष होत असलेल्या प्रजातींची संख्या कमीत कमी कालावधीत वाढवून या प्रजातींचे संवर्धन करता येईल. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उच्च प्रतीच्या वळूंची निर्मिती करून असे वळू गोठीत वीर्यमात्रा निर्मिती प्रयोगशाळेमध्ये विर्य संकलनासाठी व कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी वापर करता येतील. यामुळे राज्यातील गायी, म्हशींची उत्पादन क्षमता वाढणार आहे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस मदत होणार असल्याचा विश्वास मंत्री श्री. विखे- पाटील यांनी व्यक्त केला.

“राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार असून पशुपालकांना दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने देशी गायी आणि म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रत्येक महसुली विभागात एक अशा एकूण सहा भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत आहेत. देशी गायींचे जतन व संवर्धन करण्याच्या व्यापक दृष्टीने हा निर्णय सरकारने घेतला आहे. जेणेकरून पशुपालकांना उत्तम प्रतीचे देशी भ्रूण उपलब्ध होतील. ”

– राधाकृष्ण विखे पाटील, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *