भर पावसाळ्यात अर्जुनी घाटातून रेतीचा उपसा इकडे कर्तव्यनिष्ठता; तिकडे महसूलला चुना हेच काय वाळूचे नवीन धोरण; नागरिकांचा सवाल “त्या” अधिकाऱ्याचे तस्कराला “कॉल बॅक” ?
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क वृत्तसंकलन तिरोडा:-
अलीकडे प्रशासन महसूल सप्ताह साजरा करीत आहे. त्यातून कर्तव्यनिष्ठतेचा परिचय सर्वसामान्यांना दिला जात आहे. तर दुसरीकडे महसूल प्रशासनच राज्य शासनाच्या तिजोरीला रेती तस्करांच्या संगनमताने चुना लावत असल्याचा प्रकार उघडपणे तालुक्यात पहावयास मिळत आहे. १० जून रोजी उत्खननाची मुदत संपल्यानंतरही तालुक्यातील बोंडराणी, अर्जुनी आणि सावरा या घाटातून भर पावसाळ्यात आजही रेतीचा उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात थेट संपर्क करून एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारणा केली असता अवघ्या क्षणातच विचारणा करणाऱ्याला तो संबंधित तस्कर संपर्क साधतो. या प्रकारामुळे यंत्रणेचे तस्करांशी धागेदोरे किती घट्ट आहेत या बाबीची प्रचिती झाली आहे.
जिल्ह्यातील महसूल प्रशासन शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून वाळूच्या नवीन धोरणाची अंमलबजावणी आलबेल असल्याचे दाखवीत आहे. एवढेच नव्हे तर ०१ ऑगस्ट पासून जिल्ह्यात महसूल सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सप्ताह दरम्यान महसूल प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना कर्तव्यनिष्ठ असल्याचा परिचय देत आहेत. मात्र तिरोडा तालुक्यात महसूल प्रशासन शासनाशी की तस्करांशी प्रमाणिक आहे. हे सांगणे आता कठीण होऊ लागले आहे. १० जून रोजी वाळू उपसा करण्याची मुदत संपली असतानाही तिरोडा तालुक्यात महसूल प्रशासनाच्या तालुक्यात महसूल प्रशासनाच्या डोळ्यासमोर भर पावसाळ्यातही नदीपात्रातून यंत्राच्या माध्यमातून रेतीच्या उपसा केला जात आहे. तालुक्यातील अर्जुनी येथे डेपो तयार करण्यात आले या डेपोमध्ये बोंडराणी, अर्जुनी व सावरा या गाव शिवारातील गटातील पात्रातून रेतीची साठवणूक करण्यात आली आहे.
मात्र आता त्याच ठिकाणी लिंकिंगच्या आधारावर घेत तस्कर उघडपणे उपसा करीत आहेत. त्यामुळे “कुंपण खातोय शेत” या म्हणीप्रमाणे महसूल प्रशासनच राज्याशी असणाऱ्या तिजोरीला चुना लावत असल्याचा प्रकार उघडपणे पाहाव्यास मिळत आहे. उल्लेखनीय आहे की यासंदर्भात महसूल प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला माहिती देऊनही त्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखविण्या ऐवजी उलट त्या तस्कराला पत्रकाराच्या तक्रारीची माहिती कळविली जाते. यावरून तिरोडा तालुक्यात महसूल प्रशासन व तस्करांचे धागेदोरे चांगले चर्चेत आले आहेत.
इकडे कर्तव्यनिष्ठता; तिकडे महसूलला चुना
हेच काय वाळूचे नवीन धोरण; नागरिकांचा सवाल
जिल्हाधिकारी साहेब…कार्यवाही होणार का
तिरोडा तालुक्यात उघडपणे तस्करांचा खेळ सुरू आहे. या माध्यमातून शासनाच्या तिजोरीला चुना लावला जात आहे. असे असतानाही याकडे अधिकारी व कर्मचारी सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. एवढेच नव्हे तर कारवाई ऐवजी प्रकरण उघड होऊ नये यासंदर्भात तस्करांसोबत लिंकिंग करून पाठबळ दिले जात आहे. यामुळे तिरोडा तालुक्यातील तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब…. पुढाकार घेतील का?
असा प्रश्न तिरोडा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
“त्या” अधिकाऱ्याचा तस्कराला “कॉल बॅक”?
तिरोडा तालुक्यातील बोंडराणी, अर्जुनी व सावरा या रेती घाटातून भर पावसाळ्यात यंत्राच्या माध्यमातून रेतीचा उपसा केला जात आहे. यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने तिरोडा तालुका प्रशासनातील एका प्रमुख अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून थेट संपर्क साधले. दरम्यान १० जूनला उत्खननाची मुदत संपल्यानंतरही तिन्ही घाटातून रेती उपसा कसा सुरू आहे. याबाबत माहिती विचारली. तसेच यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. यावर त्या प्रमुख अधिकाऱ्याने कसली प्रतिक्रिया न देता सोयीस्कर टाळले. मात्र अवघ्या काही क्षणातच संबंधित तस्कर प्रस्तुत प्रतिनिधीला भ्रमणध्वनीवर संपर्क साधतो. त्यामुळे या संदर्भात कुणाशीही बोलणे झाले नसताना तस्कराला संबंधित प्रतिनिधी बाबत माहिती कशी मिळाली? हे न सुटणारे कोडे ठरले. त्यामुळे त्या अधिकाऱ्यानेच “कॉल बॅक” करून तस्कराला माहिती तर दिली नाही? अशी शंका कुशंका व्यक्त केली जात आहे.
