वन विभागाची पदभरती मानवी हस्तक्षेप विरहित! तोतयांपासून सावध राहण्याचे तरुणांना आवाहन
मुंबई, दि. 2 : राज्यात वन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या वनरक्षक व तत्सम पद भरतीसाठी निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून ही प्रक्रिया टीसीएस या संगणक क्षेत्रातील तज्ञ कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. टीसीएसमार्फत राबविली जाणारी वनविभागाची ही पदभरती प्रक्रिया संपूर्णपणे संगणकीकृत असून या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपास अजिबात वाव नाही, हे युवकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. उमेदवारांना भरतीसाठी निहित पद्धतीने सर्व परीक्षा आणि मुलाखती पार पाडणे बंधनकारक आहे, अशी माहिती वनविभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
वन विभागाच्या पद भारतीत नोकरी लावून देतो असे सांगून, काही तोतया व्यक्ती आपण अमुक तमुक अधिकारी आहोत किंवा कुणाचे तरी नातेवाईक आहोत असे भासवून उमेदवारांशी संपर्क साधत असल्याच्या तक्रारी दूरध्वनीद्वारे प्राप्त झाल्या आहेत; त्याची उच्च पातळीवरून तातडीने दखल घेतली गेली आहे. यासंदर्भात युवकांनी सावध राहावे आणि मानवी हस्तक्षेपास वाव नसलेल्या या भरती प्रक्रियेत कुणीही अशाप्रकारे वन विभागात नोकरी लावून देतो, असे सांगत असेल तर तातडीने स्थानिक जिल्हा पोलिस अधिक्षकांशी संपर्क साधून त्याची तक्रार दाखल करावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
0000