पालकमंत्र्यांनी घेतला औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा
Summary
औरंगाबाद, दि. 31 (जिमाका) : पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज विविध विषयांचा आढावा घेतला. त्यात शालेय पोषण आहार, घरकुल योजना, उद्योगांसंदर्भात, रस्त्याच्या विविध कामांची सद्यस्थिती इ. विषयांचा समावेश होता. या बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास […]
औरंगाबाद, दि. 31 (जिमाका) : पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज विविध विषयांचा आढावा घेतला. त्यात शालेय पोषण आहार, घरकुल योजना, उद्योगांसंदर्भात, रस्त्याच्या विविध कामांची सद्यस्थिती इ. विषयांचा समावेश होता.
या बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मुख्य अभियंता गवळी, कार्यकारी अभियंता येरेकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मिरासे, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा अशोक शिरसे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी पांडुरंग वाबळे, औद्योगिक सुरक्षा विभागाचे प्रमोद सुरसे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉ. प्रकाश मुंडे आदी उपस्थित होते.
भूसंपादनाचा कालबद्ध कार्यक्रम राबवा
ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रिया रहाट गाव व सोलनापूर येथे अपुर्ण आहे. याठिकाणी मोजणी, कृषी मूल्यांकन प्राप्त करणे, पुनर्मुल्यांकन करणे इ. कामांबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांना मोबदला प्रदान करण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच सुखना प्रकल्प व संत ज्ञानेश्वर उद्यानाचे काम या संदर्भातही त्यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्यात यावा. सुखना प्रकल्पा संदर्भात पुनर्वसन प्रस्ताव पाठवावा. संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून प्राप्त निधीतून कामे पूर्ण करुन उद्यानाचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे, असे निर्देश श्री. भुमरे यांनी दिले.
‘खेलो इंडिया’ अंतर्गत प्राप्त निधीतून करावयाच्या कामांचे योग्य नियोजन करा
जिल्ह्यात विभागीय क्रीडा संकूलात फुटबॉल, हॉकी सहित विविध खेळांची क्रीडांगणे तयार करण्याचे काम गतिने करावे. तसेच जिल्ह्यात खेलो इंडिया अंतर्गत प्राप्त निधीतून करावयाच्या कामांचे योग्य नियोजन करावे. यावेळी युथ होस्टेल इमारतीचे काम, पैठण क्रीडांगण, जिल्हा क्रीडा संकूल इ. कामांचाही त्यांनी आढावा घेतला.
‘साबांवि’च्या कामांचा आढावा
जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्याच्या प्रशासनाच्या सोईच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीसह अन्य नवीन इमारती प्रस्तावित आहेत. त्या कामांच्या प्रगतीचा आढावा श्री. भुमरे यांनी घेतला. कन्नड, सिल्लोड येथे होत असलेल्या शासकीय इमारतींच्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला.
या बैठकीत उद्योगांनी खर्च करावयाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शिक्षण, आरोग्य सुविधांची कामे हाती घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री भुमरे यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,औद्योगिक वसाहतींचे प्रश्न,जिल्हा परिषदेकडील विषय, शालेय पोषण आहार, घरकुल इ. विविध विषयांचा आढावा पालकमंत्री भुमरे यांनी घेतला.
00000
ठेविदारांच्या ठेवी परत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा – पालकमंत्री संदिपान भुमरे
औरंगाबाद, दि. 31 (जिमाका) : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारासंदर्भात गुन्हे दाखल झाले असून पोलीस व सहकार विभाग यांच्यामार्फत चौकशी सुरु आहे. तथापि, ठेविदारांना त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी राबवावयाच्या प्रक्रियेसाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, असे निर्देश पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज येथे दिले.
येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात ठेविदारांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासंदर्भात उपाययोजनांची माहिती आज पालकमंत्री श्री.भुमरे यांनी घेतली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सु.प. काकडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते. सहा. आयुक्त (गुन्हे) धनंजय पाटील, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख डॉ. विजय वीर तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी सांगितले की, ठेविदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया राबवावी. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून केलेल्या कारवाईची माहिती परस्परांना द्यावी. तसेच होत असलेल्या वसुलीची व ठेवी परत करण्याच्या प्रक्रियेची ठेविदारांनाही वेळोवेळी माहिती द्यावी.
बैठकीच्या प्रारंभी पोलीस अधिकाऱ्यांनी संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी होत असलेल्या कारवाईची माहिती दिली. सहकार विभागाने संस्थेचे लेखापरीक्षण, संस्थेच्या कर्जांची माहिती, त्यांची वसुली, संचालकांवर निश्चित करावयाची जबाबदारी इ. बाबत माहिती दिली.
कर्ज वितरणात झालेल्या अनियमिततेबाबत सहकार आयुक्तांच्यास्तरावरुन समिती नेमून चौकशी व्हावी, अशी सूचनाही त्यांनी केली. संस्थेच्या तसेच संचालकांच्या मालमत्तांची, संदिग्ध व्यक्ती व मालमत्तांची माहितीही नोंदणी कार्यालयाकडे द्यावी. जेणेकरुन अशा मालमत्तांचे व्यवहार होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.
000000