भर पावसात गाजवली अनिल देशमुखांनी सभा, पावसात अर्धा तास केलं भाषण कचारी सावंगा प्राथमिक आरोग्य केंद्राला 07 कोटी निधी मंजूर
कोंढाळी- वार्ताहार दुर्गाप्रसाद पांडे
काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथे विविध कामांचे भूमीपूजन कार्यक्रम सोहळा नुकताच पार पडला. माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. यानिमित्त गावातील बाजार चौकात रात्रीच्या वेळी सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान अनिल देशमुख यांच्या भाषणाच्यावेळी पोहोचताच पावसाच्या सरी सुरू झाल्या. त्यामुळे कार्यक्रम गुंडाळला जाईल असे वाटत होते. मात्र अनिल देशमुखांनी भर पावसातच सभामंचा वरून कचारी सावंगा येथील विविध विकासकामांच्या बाबद माहिती देत भाषण सुरूच ठेवले. तब्बल 30 मिनीट त्यांनी भाषण दिले. त्यामुळे परिसरात याच कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.
कचारी सावंगा येथे पाणंद रस्ता भूमीपूजन, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी भूमीपूजन आणि सिमेंट रस्ता भूमीपूजन कार्यक्रम पार पडला. तसेच यावेळी कचारीसावंगा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 07 कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती देशमुख यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला निलेश दुबे यांनी प्रास्ताविक केले. तर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, पंचायत समिती सभापती संजय डांगोरे यांनी भाषणे केली. त्यानंतर देशमुख यांच्या भाषणावेळी पावसाला सुरूवात झाली. नागरिकांनी आपल्या खुर्च्या सोडून मंदिराचा आसरा घेतला. परंतू देशमुख यांनी जागा सोडली नाही. यावेळी सरपंच रवी जयस्वाल, उपसरपंच वंदना निकोसे, अनंत भोयर, मनोज गणोरकर, शारदा खुरपडे, समीर मिसाळ, किरण भोयर, शरद सोनोने, नंदु गणोरकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.