बालविवाह प्रतिबंध नियमामध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठित
मुंबई, दि. 9 : बालविवाह (प्रतिबंध) नियम 2008 मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज आयोजित केलेल्या बैठकीत दिले.
बालविवाह (प्रतिबंध) नियमामध्ये सुधारणा करण्याबाबत आयोजित बैठकीस महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, उपायुक्त रवी पाटील, उपायुक्त तथा बालसंरक्षण कार्यक्रम व्यवस्थापक मनिषा बिरासीस, युनिसेफच्या बालसंरक्षण तज्ज्ञ अल्पा वोरा आदी उपस्थित होते.
मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य बालविवाह प्रतिबंध नियम 2008 ची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी नियमातील तरतुदींचा नव्याने आढावा घेत त्यातील त्रुटी काढण्यासह सुधारणा कराव्या लागतील. यासाठी ही समिती नेमण्यात नेमण्यात येत आहे. समितीने नियमामध्ये आवश्यक त्या बदलांच्या अनुषंगाने अभ्यास करुन सुधारित नियमाचा मसुदा तातडीने शासनास सादर करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ॲड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही 10 सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये रमा सरोद, डॉ.आशा बाजपेयी, डॉ.जया सागडे, ‘मासूम’च्या संस्था संचालक डॉ.मनिषा गुप्ते, विधायक भारतीचे संतोष शिंदे, सोशल बिहेवियर चेंज कम्युनिकेशनचे निशिध कुमार, युनिसेफच्या अल्पा वोरा, उपायुक्त (बालविकास) रवी पाटील, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी (बुलढाणा) दिवेश मराठे हे सदस्य आहेत.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491