शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – पालकमंत्री अब्दुल सत्तार. महाराष्ट्र दिनानिमित्त संत नामदेव कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम
हिंगोली (जिमाका), दि. 01 : जनतेसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम शासन करत आहे. ज्या-ज्या भागात पाऊस पडला त्या-त्या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करुन शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम करण्यात येणार आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यात नऊ वेळा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतकरी बांधवाचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये अंतिम निर्णय घेतील. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकूळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की, शासनाने केवळ 1 रुपयात विमा हप्ता भरुन पिक संरक्षित करण्याची आगळी वेगळी योजना राबविणारे आपले राज्य हे देशात वेगळे राज्य ठरले असून. यामध्ये शेतकरी बांधवाचा शंभर टक्के वाटा सरकार भरणार आहे. शासनाने यावेळेस घेतलेल्या या निर्णयाचे राज्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले असून ज्या योजनांची शेतकऱ्यांच्या बाबतीत घोषणा करण्यात आली होती, त्या सर्व योजनांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. तसेच स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी अपघात विमा मंजूर करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्या अडचणी सोडवत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
शासकीय योजनांचा लाभ राज्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा या हेतूने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय योजना सुलभिकरण अभियान राबविण्याचा निर्धार घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकाच दिवशी विविध सरकारी योजनांचा जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना एकाच छताखाली थेट लाभ देण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहरण प्रसंगी केले.
जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना संशोधनाचे पाठबळ उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्र स्थापन करण्यास 100 कोटी रुपयाच्या तरतुदीस मान्यता दिलेली आहे. यापैकी सन 2022-23 मध्ये 9 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. या हळद संशोधन केंद्रासाठी वसमत येथे जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संशोधन केंद्राचे भूमिपूजन लवकरच होणार असून या केंद्राच्या माध्यमातून हळद उत्पादक शेतकऱ्यांना सुविधांचा लाभ मिळणार आहे. हे हळद संशोधन केंद्र स्थापन झाल्यानंतर नवनवीन व्हरायटीमुळे हिंगोली जिल्ह्याचे देशात नाव होणार आहे. त्यामुळे हे हळद संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात होत असलेला लिगो इंडिया हा प्रकल्प भारतातील प्रात्यक्षिक भौतिकशास्त्र या विषयातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाने 186 एकर जमीन संपादनासाठी महत्वाची भूमिका बजावली असून या प्रकल्पासाठी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2600 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पामुळे हिंगोली जिल्हा जगाच्या नकाशावर आला आहे. या प्रकल्पामध्ये दक्षिण गोलार्धातील गुरुत्वीय लहरीचे अभ्यास स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
गरिबांना घरकूल मंजूर केल्यानंतर वाळू उपलब्धतेबाबत अनेक अडचणी होत्या. त्या दूर करण्यात आल्या असून आता सर्वसामान्यांना घरपोच व स्वस्तात वाळू मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी हिंगोली जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. याबाबत टेंडर प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यामुळे वाळूमाफियांना आळा बसणार आहे. आपल्या हिंगोली जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण सुमारे 37 टक्के असून, इतर जिल्ह्याच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यातील बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी ‘बालविवाह मुक्त हिंगोली’ मोहिम व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. याचा परिणाम सन 2019 पासून जिल्ह्यात 67 बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने चला जाणूया नदीला या शीर्षकाखाली लोकसहभागातून नदी संवाद यात्रा हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात 10 मार्च ते 26 एप्रिल, 2023 या कालावधीत नदी संवाद यात्रा हा उपक्रम राबवून हिंगोली जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यामध्ये हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव या पाच नगर पालिकामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेची सुरुवात होणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 4 नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या दवाखान्यामध्ये सर्व उपचार व तपासण्या मोफत केल्या जाणार असून औषधेही मोफत पुरविली जाणार आहेत. गरोदर मातांची नियमित तपासणी त्याचप्रमाणे लसीकरण आधी आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत. उष्माघातापासून बचाव करण्याकरिता हिंगोली जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांनी उष्माघाताशी संबंधित आजारापासून बचाव करण्यासाठी आहारासंबंधी घ्यायची खबरदारी याबद्दल जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. .
जिल्ह्यात माहे मार्च 2023 मध्ये झालेल्या अवेळी पाऊस व गारपीटीमुळे 6 हजार 526 शेतकऱ्यांच्या 3 हजार 838 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 6 कोटी 4 लाख 49 हजार रुपयाचा निधी मंजूर केला आहे. हा निधी शासनाकडून डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच एप्रिल, 2023 मध्ये सद्यस्थितीत जिल्ह्यातील 32 गावातील अंदाजे 165 हेक्टर फळबागाचे नुकसान झाले आहे. त्याअनुषंगाने सर्वेक्षण करुन शासनाकडे निधी मागणी नोंदविण्याची कार्यवाही सुरु आहे. सन 2022-23 या वर्षात खरीप हंगामामध्ये 3 लाख 88 हजार शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेत सहभाग नोंदवून 2 लाख 20 हजार हेक्टर क्षेत्रावर विमा काढलेला आहे. हिंगोली जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकऱ्यांची दावा रक्कम 105 कोटी 53 लाख रुपयापैकी 103 कोटी 70 लाख रुपयाचे वाटप झाले आहे. उर्वरीत 1 कोटी 38 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.
शासनाने गुढीपाडवा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यातील 2 लाख 18 हजार 799 पात्र लाभार्थ्यांना रवा, साखर, चनादाळ प्रत्येकी एक किलो व पामतेल एक लिटर याप्रमाणे आनंदाचा शिधा कीटचे वितरण करण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्य योजनेतील 7 लाख 64 हजार 399 पात्र लाभार्थ्यांना एप्रिल ते डिसेंबर, 2022 या कालावधीत 34 हजार 681 मेट्रिक टन अन्नधान्याचा लाभ देण्यात आला आहे.
हिंगोली नगर परिषदेने सन 2022-23 मध्ये नागरी प्रशासनाच्या विविध विकास कामामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. तर शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा-2022 मध्ये राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल दि. 25 एप्रिल, 2023 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, 05 कोटी रुपयाचे बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिनांक 1 एप्रिल ते 1 मे पर्यंत सामाजिक न्याय समता पर्व साजरा करण्यात येत असून या कालावधीत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेविषयी जनजागृती करत लाभ देण्यात आला आहे. तसेच कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत 40 बेघर कुटुंबांना शासनाकडून दोन वसाहती तयार करण्यात आल्या आहेत.
मागील वर्षभरात मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानात हिंगोली जिल्ह्याने राज्यात उत्कृष्ट कामगिरी करत औरंगाबाद विभागातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे 25 जानेवारी रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी राज्य तसेच आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून एकत्र येऊन प्रयत्न करु या, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
पालकमंत्री यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत सुधारक सन्मानासाठी निवड झालेल्या संदिप आत्माराम चौधरी, मुंजाजी बाजिराव पावडे, अनिल आनंदराव खिल्लारे यांना सन्मान चिन्हे तर जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा हिंगोलीद्वारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुके, राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट तालुका, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट क्लष्टर, राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट क्लष्टर, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत आदि पुरस्कार तसेच जिल्हा पोलीस विभागातील नारायण खंडुजी मुकाडे, विठ्ठल नागोराव कोळेकर, निलेश रमेशराव हलगे, आशिष मधुकर उंबरकर यांना महाराष्ट्र पोलीस पदकाचे वितरण, सरळसेवा भरती व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडून प्राप्त झालेल्यांना नियुक्ती पत्र तसेच नागोराव दिलीपराव कांबळे यांना आदर्श तलाठी साठी प्रमाणपत्र व धनादेशाचे वाटप पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
रुग्णवाहिकेचे लोकार्पण
यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीमार्फत घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोर्कापण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंडीत अवचार यांनी केले. यावेळी विविध विभागांचे विभाग प्रमुख, लोक प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.