महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

‘अग्निवीर’ होऊन देशसेवा करण्यासाठी युवकांना प्रेरित करावे – राज्यपाल रमेश बैस राज्यपालांच्या हस्ते बोरिवली येथे संरक्षण प्रदर्शनाचे उद्घाटन

Summary

मुंबई, दि.२२ : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागविली पाहिजे व त्यासाठी ‘अग्निवीर’ होऊन देशसेवा करण्यासाठी त्यांना प्रेरित केले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. बोरिवली मुंबई येथील कोरा केंद्र मैदानावर सुरु झालेल्या दोन […]

मुंबई, दि.२२ : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागविली पाहिजे व त्यासाठी ‘अग्निवीर’ होऊन देशसेवा करण्यासाठी त्यांना प्रेरित केले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

बोरिवली मुंबई येथील कोरा केंद्र मैदानावर सुरु झालेल्या दोन दिवसांच्या संरक्षण प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते आज संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

 ‘अथर्व फाउंडेशन’ या संस्थेने सैन्य दलांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये भारताची संरक्षण सिद्धता दाखविणारी युद्धसामुग्री व उपकरणे ठेवण्यात आली आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपान येथे एका फॅक्टरीला भेट दिली होती, त्यावेळी तेथील कामगार एक क्षण देखील वाया न दवडता आपले काम करण्यात मग्न असल्याचे त्यांनी पाहिले. आपल्या देशातील युवाशक्तीमध्ये देशभक्तीची भावना जागविली तर वेळ व्यर्थ न घालवता ते देशासाठी कार्य करतील व देश प्रगतीपथावर जाईल, असे राज्यपालांनी सांगितले.

सैन्य दल देशाची शान असून त्यांच्यामुळेच देश निरंतर प्रगतीपथावर अग्रेसर होत आहेत. अनेक वर्षे संरक्षण सामग्री आयात करणारा भारत आज संरक्षण सामग्रीबाबत आत्मनिर्भर आणि निर्यातदार देश झाला आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

देशाला शिस्तीची गरज आहे, असे नमूद करून, आपले घर, परिसर, कार्यस्थळ स्वच्छ ठेवणे तसेच वीज व पाण्याची नासाडी थांबवणे ही देखील देशसेवाच असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

बॅरिस्टर नाथ पै यांच्या संसदेतील भाषणाचा उल्लेख करून जात, पंथ याचा वृथाअभिमान घेणारी संकुचित मानसिकता सोडून आपण प्रथम भारतीय आहोत हा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

भव्य संरक्षण प्रदर्शन आयोजित करून युवकांना युद्धकथा कथन, जवानांच्या साहस कथा तसेच तज्ज्ञ लष्करी अधिकाऱ्यांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून सैन्य दलांमध्ये भरती होण्यास प्रेरित करीत असल्याबद्दल राज्यपालांनी अथर्व फाउंडेशनचे कौतुक केले.

सुरुवातीला राज्यपालांनी प्रदर्शनाची पाहणी केली. राज्यपालांच्या हस्ते यावेळी हुतात्मा जवानांच्या मुलींना लॅपटॉप भेट देण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संरक्षण प्रदर्शन उदघाटन सोहळ्याला खासदार गोपाल शेट्टी, अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार सुनील राणे, प्रदर्शनाचे निमंत्रक कर्नल (नि.) सुधीर राजे, सैन्य दलातील अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *