महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

वनारक्षित जमिनीबाबत तक्रारी सोडवण्यासाठी ‘एकल खिडकी योजना’ आणण्यात येणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार। विधानसभेतील आश्वासनासंदर्भात बैठकीत निर्णय

Summary

मुंबई, दि. ३ :- खाजगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच वन आरक्षित जमिन याबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी आणि यामध्ये सुलभता आणण्यासाठी ‘एकल खिडकी योजना’ वन विभागामार्फत आणण्यात येईल असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार, खाजगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी व […]

मुंबई, दि. ३ :- खाजगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच वन आरक्षित जमिन याबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी आणि यामध्ये सुलभता आणण्यासाठी ‘एकल खिडकी योजना’ वन विभागामार्फत आणण्यात येईल असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार, खाजगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी व त्याबाबत कायद्यात करावी लागणारी सुधारणा याबाबतची आढावा बैठक आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार किसन कथोरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध विचारात घेऊन या विषयामध्ये सुलभता येण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा राज्य शासनाचा पूर्ण प्रयत्न असणार आहे. यासाठीच ‘एकल खिडकी योजना’ तयार करण्यात येईल.

महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिनियम, १९७५ च्या तरतूदींच्या अनुषंगाने कार्यवाही करताना मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय आणि याबाबत महाराष्ट्रात करावयाची कार्यवाही याचा पूर्ण अभ्यास करण्यात येईल. यानंतर या विषयाबाबत केंद्र शासनाशी चर्चा करुन याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

या बैठकीमध्ये महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिनियमाचे कलम २२ (अ), कलम ६, मा.सर्वोच्च न्यायालयाचे विविध आदेश, शासनाची परिपत्रके व शासन निर्णयांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *