BREAKING NEWS:
नंदुरबार महाराष्ट्र हेडलाइन

गरीब, कष्टकऱ्यांचा सणातील आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘आनंदाचा शिधा’ – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Summary

नंदुरबार, दि. २२ (जिमाका):  गरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांचा सणांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी शासनामार्फत ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात येत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. नंदुरबार व चौपाळे येथे गुढीपाडव्यानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरणावेळी पालकमंत्री […]

नंदुरबार, दि. २२ (जिमाका):  गरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांचा सणांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी शासनामार्फत ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात येत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

नंदुरबार व चौपाळे येथे गुढीपाडव्यानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरणावेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद कृषी सभापती हेमलता शितोळे, माजी. जि.प.सदस्य सागर तांबोळी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, सरपंच नामदेव भिल (चौपाळे ) आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. याचे वितरण गुढीपाडव्यापासून करण्यात येणार आहे. शासन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गोरगरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांना मदत करत आहे. नुकतेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या रक्कमेत वाढ केली आहे. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘महिला सन्मान योजना’ सुरु केली असून या योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली असून या योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महिलासाठी लवकर स्वतंत्र महिला धोरण राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वी खेड्यापाड्यात महिलांना दूरवर पाणी घेण्यासाठी जावे लागत होते. परंतु, जल जीवन मिशनच्या माध्यमातुन प्रत्येक घरात पाणी देण्यात येत आहे. शासन महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवित असून या योजनेचा लाभा घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या की, गुढीपाढवा व आगामी येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सण गोरगरीबांना आनंदाने साजरे करता यावे या सण उत्सवांच्या काळात गोरगरिबांना गोड करता यावे यासाठी शासनाने आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारमार्फत गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून मोफत अन्न धान्य देण्यात येत असून  हे कोरोना काळापुरताच मर्यादित न ठेवता जोपर्यंत गोरगरिबांचे कोरोनाकाळातील संकट दूर होत नाही तोपर्यंत गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत रेशन धान्य देणार येणार आहे. केंद्र शासनाच्या विविध योजना प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.

असा असेल “आनंदाचा शिधा”…

जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रय रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर या परिमाणात पामतेल हा शिधा देण्यात येणार आहे. हा “आनंदाचा शिधा” गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षापासून ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे. सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्तभाव दुकानात जावून ई-पास मशीनवर आपला अंगठा प्रमाणित करुन शिधा संच प्राप्त करावा.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *