काटोल येथे 10 मार्चला ग्राम विकासासाठी कार्यशाळेचे आयोजन •काटोल-नरखेड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसचिव यांच्यासाठी ग्रामविकास कार्यशाळा. • माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांचा स्तुत्य उपक्रम.

काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसचिव यांच्यासाठी ग्रामविकास कार्यशाळा शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी दु. 2.30 वा. अरविंद सहकारी बँक सभागृह, बस स्टैंड जवळ, काटोल येथे आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून ग्राम विकासाचे जनक भास्कर पेरे पाटील, पाटोदा जि. औरंगाबाद हे उपस्थित राहणार आहे. सोम्या शर्मा (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपुर व डॉ. स्वप्निल मेश्राम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद, नागपुर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राज्याचे माजी ग्रामीण विकास मंत्री रणजितबाबु देशमुख हे कार्यशाळेचे अध्यक्षपद भूषवतील.
भास्कर पेरे पाटील सरपंच असताना पाटोदा गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. पहिल्यांदा तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि दुसऱ्या वेळेला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हातून त्यांचा सत्कार करण्यात आला होता. महाराष्ट्र सरकारकडूनही त्यांना पुरस्कार मिळाला होता. पाटोदा गाव शंभर टक्के उघड्यावर शौच्यमुक्त आहे. पेरे पाटील यांच्या कारकिर्दीत गावामध्ये झाडे लावली गेली आणि गावाला हरित केले गेले. भास्कर पेरे पाटील पाटोदा ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या पदांवर राहिलेले आहेत. आदर्श गाव कसे असावे, ग्रामस्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी अशा अनेक विषयांवर ते मार्गदर्शनसुद्धा करतात. त्यांच्या मार्गदर्शन काटोल आणि नरखेड तालुक्यातील आदर्श गावांच्या निर्मितीसाठी ही कार्यशाळा महत्वाची आहे”, असे या कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार डॉ. आशिषराव देशमुख, कार्यकारी अध्यक्ष अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठान, नागपूर यांनी सांगितले. या कार्यशाळेला जास्तीत जास्त सरपंच, उपसरपंच व ग्रामसचिवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.