आकर्षक लोगोच्या माध्यमातून जगात ‘बॉटनिकल गार्डन’चा परिचय होईल – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार विसापूर येथे लोगोचे अनावरण
Summary
चंद्रपूर, दि. 26 : जिल्ह्यातील विसापूर येथे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभे राहत आहे. कोणत्याही वास्तुचा लोगो हाच त्याचा परिचय असतो. त्यामुळे बॉटनिकल गार्डनचा लोगो जगात सर्वत्र पोहोचण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन व्हावे. या लोगोच्या माध्यमातून देशातच नव्हे […]
चंद्रपूर, दि. 26 : जिल्ह्यातील विसापूर येथे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभे राहत आहे. कोणत्याही वास्तुचा लोगो हाच त्याचा परिचय असतो. त्यामुळे बॉटनिकल गार्डनचा लोगो जगात सर्वत्र पोहोचण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन व्हावे. या लोगोच्या माध्यमातून देशातच नव्हे तर जगामध्ये विसापूरच्या (चंद्रपूर) बॉटनिकल गार्डनचा परिचय होईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
विसापूर येथे बॉटनिकल गार्डनच्या लोगो (प्रतीक चिन्ह) अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक जीतेंद्र रामगांवकर, उपवनसंरक्षक श्वेता बोडू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अशोक गाडेगोणे, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ.दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार स्नेहल रहाटे, माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, हरीश शर्मा, ब्रिजभूषण पाझारे, किशोर पंदीलवार आदी उपस्थित होते.

श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनच्या लोगो चे अधिकृत उद्घाटन झाले, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोगो निर्माण करण्याच्या दृष्टीने अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करून हा लोगो निर्माण केला आहे. हा लोगो भविष्यामध्ये देशातच नव्हे तर जगामध्ये बॉटनिकल गार्डनचा परिचय करून देईल. या लोगोमध्ये बॉटनिकल गार्डनची भिंत म्हणजे गोंडकालीन किल्ल्याची प्रतिकृती, मत्सालय, प्ल्यॅनाटोरियम, जैवविविधता, तीन स्टार बॉटनिकल गार्डनच्या सर्वांगीण माहितीचा समावेश आहे. या लोगोमध्ये तीन स्टार असले तरी बॉटनिकल गार्डन मात्र फाईव्ह स्टार होईल.
ते पुढे म्हणाले, बॉटनिकल गार्डन राज्यातील उत्तम वास्तू व्हावी, एवढेच नव्हे तर हे गार्डन ज्ञानाचे, रोजगाराचे केंद्र व्हावे, जैवविविधता, टॉकिंग ट्री व सायन्स पार्कच्या माध्यमातून विज्ञानाची माहिती देणारे हे ज्ञानवर्धक केंद्र व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वनविभागातील 16 हजारांपेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण व संवर्धन करतात, याचा मला अभिमान वाटतो. वनसंरक्षण व वनसंवर्धनासाठी सतत कार्यरत असलेले वनअधिकारी, वन कर्मचारी, वनरक्षक, वनक्षेत्रपाल व वनमजूर यांच्या कार्याचे त्यांनी यावेळी कौतुक केले. बॉटनिकल गार्डनमध्ये विविध प्रजातीचे रंगबिरंगी मासे हवे असल्यास तारापूर मत्स्यालयातून उपलब्ध करून देता येईल, असेही ते म्हणाले.
विसापूर परिसरात एसएनडीटी विद्यापीठ उपकेंद्राच्या माध्यमातून रोजगाराभिमुख शिक्षण, बॉटनिकल गार्डन ज्ञानवर्धक केंद्र, बल्लारपूर स्टेडियमच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे तर सैनिकी शाळेच्या माध्यमातून देशाच्या सीमेची रक्षा करणारे सैनिक तयार करण्याचे कार्य होत आहे. या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती येथील कार्याचे कौतुक करून जाईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकेत मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर म्हणाले, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन या ठिकाणी होत आहे. लवकरच या गार्डनचे लोकार्पण करण्यात येईल. नैसर्गिक शिक्षण, निसर्ग पर्यटनात वाढ करणे, रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, रोपवाटिकांची संख्या वाढवणे, पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती, जैवविविधतेचे संवर्धन व जतन, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन व मत्सालय आदी उपक्रमाद्वारे ज्ञान-विज्ञानाचे शिक्षण या वनस्पती उद्यानातून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाव्यतिरिक्त वन अकादमी, सफारी प्रकल्प, रेस्क्यू प्रकल्प, उद्योजक केंद्र, निसर्ग पर्यटन केंद्र तसेच बीआरटीसी प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. बॉटनिकल गार्डन देखील लवकरच लोकार्पित होणार असून आज लोगो अनावरण पार पडत आहे.
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा तयार करणारे शंतनु इंगळे, गार्डनचा लोगो निर्माण करणारे विवेक रानडे यांचा सत्कार करण्यात आला.
बल्लारपूर रेल्वे दुर्घटनेतील मृतक शिक्षिकेच्या कुटुंबियाला धनादेश वितरीत
बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जाहीर केले होते. त्याअनुषंगाने श्री. मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार हे अर्थसहाय्य मंजूर झाले. श्रीमती रंगारी यांच्या कुटुंबीयांना पाच लक्ष रुपयाच्या धनादेशाचे वितरण बल्लारपूर येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार स्नेहल रहाटे, नायब तहसीलदार सतीश साळवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.