BREAKING NEWS:
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी विशेष कायदा करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

Summary

जळगाव, दि. 1 – बळीराजाची फसवणूक टाळण्यासाठी आगामी अधिवेशनामध्ये विशेष कायदा करण्यात येईल, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल. असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अमळनेर येथे केले.   अमळनेर येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाचे […]

जळगाव, दि. 1 – बळीराजाची फसवणूक टाळण्यासाठी आगामी अधिवेशनामध्ये विशेष कायदा करण्यात येईल, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल. असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अमळनेर येथे केले.

 
अमळनेर येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाचे उद्घाटन व एरंडोल येथील पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन गृहमंत्री श्री.देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर, आमदार चिमणराव पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार अनिल पाटील, आमदार श्रीमती लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्यासह अमळनेरच्या नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, एरंडोलचे नगराध्यक्ष रमेश परदेशी, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजीमंत्री सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी आमदार साहेबराव पाटील, दिलीप वाघ, रवींद्र भैय्या पाटील, हाजी गफ्फार मलिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


यावेळी गृहमंत्री देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हितासाठी काम करीत आहेत. बळीराजाच्या हिताला राज्य शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळून त्यांना संरक्षण मिळण्यासाठी विशेष कायदा आणण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे एस आर पी एफ च्या बटालियन चे काम लवकरच सुरू होणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल.महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखणे, दोषींवर कारवाई करुन त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी आंध्रप्रदेश राज्याच्या धर्तीवर कायदा करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने राज्यातील पोलीसांच्या वसाहतींसाठी पहिल्या टप्प्यातच 750 कोटी रुपयांची तरतूद केली असून, राज्यातील पोलिस वसाहतींच्या प्रस्तावांना टप्प्याटप्प्याने मंजुरी देऊन या वसाहती गतीने पूर्ण करणार असून जळगाव जिल्ह्यातील पोलीसांचे व पोलीस दलाचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस वसाहतींना प्राधान्याने पाणीपुरवठा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत असतात, त्यामुळे पोलिसांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. पोलिसांच्या वसाहतींना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी प्राधान्याने सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर जिल्ह्यातील पोलिसांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असून जळगाव जिल्हा कारागृहाची क्षमता वाढवावी, जळगाव कारागृह नवीन जागेत स्थलांतरित करावे, त्याचबरोबर भुसावळ येथे वर्ग-1 जिल्हा कारागृहास मंजुरी मिळावी. तसेच जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती व पोलीस स्टेशनमधील गावांची संख्या लक्षात घेता पाळधी व म्हसावद येथे नव्याने पोलीस स्टेशनची निर्मिती करणे, चोपडा, यावल, फैजपूर येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधकामास मंजुरी मिळण्याची मागणीही त्यांनी यावेळी गृहमंत्र्यांकडे केली.

प्रत्येक सासुरवासिणीला पोलीस स्टेशन हे माहेर वाटले पाहिजे – प्रताप दिघावकर

 शासन पोलिसांचे प्रश्न प्राधान्याने सोडवत आहे अशावेळी पोलिसांनीही प्रत्येक नागरिकाला चांगली वागणूक दिली पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक भगिनीला (सासुरवासिणीला) पोलिस स्टेशन हे तीचे माहेर आहे असे वाटले पाहिजे. पीडित, गोरगरीब, शेतकरी यांना न्याय देण्याची भूमिका पोलिसांनी निभावली पाहिजे असे सांगून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर म्हणाले की, नाशिक येथील पदाचा कार्यभार घेतल्यापासून सन 2013 पासून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे बुडविलेले पाच कोटी रुपये मिळवून दिले असून अजून 661 व्यापारी बुडविलेले पैसे परत देणार आहे. त्याचबरोबर अमळनेर पोलीस स्टेशन हे शहराच्या बाहेर असल्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील पोलीस चौकीतच एफआयआर दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही श्री. दिघावकर यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे म्हणाले की, पोलिसांचा महत्त्वाचा विषय आज मार्गी लागत आहे, कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाची निवासस्थाने उपलब्ध झाल्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी अधिक जोमाने व उत्साहाने काम करतील अशी ग्वाही देऊन त्यांनी जिल्ह्यातील पोलीसांचे व पोलीस दलाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची विनंती गृहमंत्र्यांना केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव व पोलीस निरिक्षक अंबादास मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिगंबर महाले यांनी तर उपस्थितांचे आभार अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी मानले. या कार्यक्रमास पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी  व त्यांचे कुटूंबिय तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *