मुंबईत पहिल्या विकास कार्य गटाच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या विकास कार्य गटाच्या प्राधान्यांविषयी व्यापक विचारमंथन
Summary
मुंबई, दि. 14 : विकास कार्य गट (डीडब्ल्यूजी) जाहीरनाम्यासाठी प्रस्तावित केलेल्या भारताच्या महत्त्वाच्या अग्रक्रमांवर भरीव चर्चेला आज महाराष्ट्रातील मुंबई येथे पहिल्या डीडब्ल्यूजी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सुरवात झाली – ज्यात ‘शाश्वत विकास उद्दिष्टांवरील प्रगतीचा वेग वाढवणे’ या विषयावरील सत्र 1 चे […]
मुंबई, दि. 14 : विकास कार्य गट (डीडब्ल्यूजी) जाहीरनाम्यासाठी प्रस्तावित केलेल्या भारताच्या महत्त्वाच्या अग्रक्रमांवर भरीव चर्चेला आज महाराष्ट्रातील मुंबई येथे पहिल्या डीडब्ल्यूजी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सुरवात झाली – ज्यात ‘शाश्वत विकास उद्दिष्टांवरील प्रगतीचा वेग वाढवणे’ या विषयावरील सत्र 1 चे दोन भागांत आयोजन करण्यात आले आहे.
डीडब्ल्यूजी हा जी 20 शेर्पा ट्रॅक अंतर्गत 13 कार्यगटांपैकी एक असून, 2010 मध्ये जी 20 च्या स्थापनेपासून विकास जाहीरनाम्याचा एक अभिरक्षक आहे. सन 2008 च्या आर्थिक संकटानंतर संकल्पित करण्यात आलेल्या पहिल्या कार्य गटांपैकी तो एक होता.
विकास कार्य गटाची 13-16 डिसेंबर या कालावधीतील तीन दिवसीय बैठक, भारताच्या विकास कार्य गटाच्या प्राधान्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून सर्वसाधारण विकासात्मक मुद्दे अधोरेखित करेल, ज्यामध्ये – विकासासाठी डेटाच्या परिवर्तनीय शक्तीचा उपयोग करणे, पर्यावरणासाठी जीवनशैली (LiFE) एक जागतिक चळवळ म्हणून भारताच्या बांधिलकीला मुख्य प्रवाहात आणणे, आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास सुविधेद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीचा वेग वाढवणे, डिजिटल परिवर्तन आणि केवळ हरित संक्रमण यासारख्या मोठ्या गुणक प्रभावांसह सर्वसाधारण उपक्रमांचा समावेश आहे.
भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांच्या व्हिडिओ संदेशाने आजच्या बैठकीची सुरवात झाली. जगातील विकसनशील राष्ट्रांच्या बहुआयामी हितांचे अचूक प्रतिनिधित्व करण्यासाठी ग्लोबल साउथचा आवाज म्हणून भारताची जबाबदारी त्यांनी अधोरेखित केली. गेल्या वर्षी यशस्वी परिणाम देणाऱ्या इंडोनेशियाची दखल घेत, क्वात्रा म्हणाले की, “आम्ही आमच्या परीने, जी 20 मधील महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर एकमत पुढे नेण्याचा आणि मजबूत करण्याचा संकल्प करतो.”
भारताचे विकास कार्य गटाचे सह-अध्यक्ष, संयुक्त सचिव नागराज नायडू आणि एनम गंभीर यांनी दिवसभराच्या कार्यक्रमांचा आढावा घेऊन, भारताच्या प्राधान्य क्षेत्रांची रूपरेषा आणि शाश्वत विकास उद्दिष्टांमधील महत्त्वपूर्ण जागतिक पीछेहाट यांचा संदर्भ देत चर्चासत्राची औपचारिक सुरुवात केली. चर्चासत्रात भारताचे प्रस्ताव तसेच अन्न, ऊर्जा आणि वित्तीय बाजारपेठेतील सध्याच्या व्यत्ययांचे तात्काळ विकासात्मक परिणाम यांचा समावेश होता.
चर्चासत्रातील विश्राम काळात, मान्यवर पाहुण्यांनी स्थानिक महाराष्ट्रीय हस्तकला प्रदर्शनाचा आनंद घेतला, ज्यामध्ये स्टार्ट-अप व्यवसायांचा समावेश होता आणि मातीची भांडी बनवण्याचा स्टॉल होता.
शाश्वत विकास उद्दिष्टांवरील गतीमान प्रगती यावरील सत्र 1 च्या दुसऱ्या टप्प्यात 2030 जाहीरनाम्यात केलेल्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी राष्ट्रांना आवश्यक असलेल्या संरचनात्मक आराखड्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले – ज्यात विकसनशील देशांची लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी कौशल्य आणि क्षमता वृद्धी, चालू असणाऱ्या कामाला गती देणे आणि आवश्यक तेथे नवीन कृती योजना तयार करणे याचा अंतर्भाव होता. भारताने देश, गट आणि ट्रॅक मध्ये प्रभावी सल्लामसलत सुलभ करण्यावर जोर देत बहुपक्षीय संस्था आणि प्रक्रियांमध्ये विकसनशील देशांसाठी बहुमताच्या गरजेवर भर दिला.
वित्तीय सहकार्य आणि विकास संस्था (OECD) आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारे (ILO) अनुक्रमे लिंगभेदाचे दूरगामी परिणाम तसेच केवळ हरित संक्रमण आणि डिजिटल परिवर्तनाच्या संभाव्यतेवर सादरीकरण केले गेले.
वित्तीय सहकार्य आणि विकास संस्थेच्या फेडेरिको बोनाग्लिया यांनी मान्यवरांना माहिती दिली की लैंगिक भेदभाव दूर केल्याने जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादनात 6 ट्रिलियन डॉलर ची भर पडेल.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुस्तफा कमल गुएई यांनी शाश्वत आर्थिक वाढ सुनिश्चित करण्यासाठी हवामान आणि विकास धोरणे यात सुसूत्रता आणण्याची जागतिक आवश्यकता अधोरेखित करून, हवामान बदल हे श्रमिक बाजारावर कसा परिणाम करतात हे दाखवून दिले. ते म्हणाले, “चक्राकार अर्थव्यवस्थेकडे वळल्याने 2030 पर्यंत 100 दशलक्ष हरित नोकऱ्या निर्माण होण्याची क्षमता आहे.”
शाश्वत वित्तपुरवठ्यासाठी विद्यमान आराखडा आणि अडथळे, रोजगार, शिक्षण आणि जागतिक स्तरावर डिजिटल दरी दूर करण्यासाठी आवश्यक पावले याद्वारे लैंगिक समानता प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांना बळकटी देण्याची गरज यावरही देशांनी चर्चा केली.
भारताचे विकास कार्य गटाचे सह-अध्यक्ष नागराज नायडू आणि ईनम गंभीर यांनी देशाच्या हस्तक्षेपाविषयी थोडक्यात माहिती देऊन आणि आपल्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाकरिता उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या योगदानासाठी आणि समर्थनासाठी त्यांचे आभार मानून दोन सत्रांचा समारोप केला.
ताज लँड एंड हॉटेलच्या लॉनवर रात्रीचे जेवण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने दिवसाची सांगता झाली, जिथे मान्यवरांनी मुंबईच्या जगप्रसिद्ध बॉलीवुड चित्रपट उद्योगाची ओळख करून घेतली.