टिळकनगर परिसराची स्वच्छता तातडीने करण्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश
Summary
मुंबई, दि. ३१ : चेंबूर येथील खुल्या मैदानाची देखभाल दुरूस्ती तसेच टिळकनगर परिसराची मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्वरित स्वच्छता करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले. चेंबूर येथील एम. वेस्ट वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या […]

मुंबई, दि. ३१ : चेंबूर येथील खुल्या मैदानाची देखभाल दुरूस्ती तसेच टिळकनगर परिसराची मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्वरित स्वच्छता करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले.
चेंबूर येथील एम. वेस्ट वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश फातर्पेकर, सर्व विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांनी विविध ११९ विषयासंदर्भात आपले तक्रार अर्ज सादर केले. यामधील ७५ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्यासमोर उपस्थित राहून प्रत्यक्ष समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.
नागरिकांनी मानले पालकमंत्री यांचे आभार
यापूर्वी एम. इस्ट वॉर्ड, गोवंडी ( पूर्व) येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या बैठकीत एका स्थानिकाने केशरी शिधापत्रिकेची ऑनलाईन डेटा एन्ट्री झाली नसल्याबाबत तक्रार केली होती. या शिधापत्रिकेचे संगणकीकरण केले असल्याची माहिती यावेळी शिधावाटप अधिकारी यांनी पालकमंत्री यांना दिली. या तक्रारीचे निवारण केल्याबद्दल संबंधितांनी पालकमंत्री आणि प्रशासनाचे आभार मानले.
‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी https://mumbaisuburban.gov.in तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेसंदर्भात तक्रारीसाठी https://portal.mcgm.gov.in या लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.