एक हात मदतीचा लॉयन्स क्लब कडून सिरोंचा तालुक्यातील 500 पूरपीडित कुटुंबांना जीवनाशक वस्तूंची मदत
यावर्षी जुलै महिन्यात सतत १० दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील 54 गावात प्रचंड पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांचे संसार उध्वस्त झालेत, हजारो कुटुंब बेघर झालेत, अशा आपतग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत मिळावी म्हणून सामाजिक कार्यात नेहमीच तत्पर असलेल्या लायन्स क्लब इंटरनॅशनल ने *एक हात मदतीचा पुढे करीत* ४ गावातील ५०० कुटुंबांना आठ लाखाची मदत जीवनावश्यक वस्तूच्या स्वरूपात अदा केली.
10 दिवस सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला तसेच धरणामधील जलसाठ्यात प्रचंड वाढ झाल्यामुळे अनेक गावे पाण्याखाली आली, स्वतःचे जीव वाचवण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागला, जीवनाशक वस्तू , धान्य पुरात वाहून गेल्यामुळे जीवन जगण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. अनेक गावात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन चक्क राष्ट्रीय महामार्गावर तळ ठोकून वास्तव्य करण्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक सामाजिक संघटनांनी व सरकारी मदत गरजू पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला, परंतु तीही मदत तोकडी पडली. फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेली काही गावे या मदतीपासून वंचित राहिली, याची दखल घेत लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234- H 1 चे प्रांतपाल टी. व्ही. श्रवण कुमार नायर यांचे निर्देशानुसार लायन्स क्लब गडचिरोलीच्या टीमने डॉ सुरेश लडके, शेमदेव चाफले व गिरीश कुक्कुडपवार यांच्या नेतृत्वात सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली, सोमनूर, चिंतनपल्ली, व नगरम या चार गावातील अत्यंत गरजू 500 कुटुंबाची निवड केली, यासाठी असर अली, सोमनुर या भागातील सामाजिक कार्यकर्ते गजानन कलाक्षपवार, श्रीकांत
सूगरवार, नगरम येथील रमेश बतुल्ला, अरुण चेंबूलवार यांची मोलाची मदत लाभली.
या 500 कुटुंबांना जीवनाशक वस्तूच्या 500 किट वाटण्यात आल्या. प्रत्येक किटमध्ये चांगल्या प्रतीची 2 ब्लॅंकेट, 2 बेडशीट, 1 मच्छरदाणी, 1 ताडपत्री, 1 लेडीज गाऊन, 1 बकेट इत्यादी वस्तूंचा समावेश समावेश होता. एक चांगल्या प्रकारची मदत लायन्स क्लबच्या वतीने मिळाल्याबद्दल नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होत होता.
यावेळी गरजूंना किट वाटप करताना प्रांतपाल टी. व्ही श्रवण कुमार नायर, उपप्रांतपाल बलबीर सिंग वीज, किचन कॅबिनेट मधील पदाधिकारी निशिकांत प्रतापे, राजन गुप्ता, शरद वीजवर्गी, पूरग्रस्त गावांमधील सामाजिक कार्यकर्ते गजानन कलाक्षपवार, श्रीकांत सूगरवार , रमेश बतुल्ला, अरुण चेंबूलवार, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ सुरेश लडके, लायन्स क्लब गडचिरोलीचे अध्यक्ष डॉ सविता सादमवार, सचिव महेश बोरावार, कोषाध्यक्ष ममता कुकुडपवार, ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब पद्मावार, भुजंग हिरे, शेषराव येलेकर, नितीन चेंबूलवार , गावातील सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेषराव येलेकर
. गडचिरोली