गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात माझी काटेमुंडरीची शाळा

गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात माझी काटेमुंडरीची शाळा
स्वर्गीय स्व. गो ना. मुनघाटे यांच्या कादंबरीची घेतली दखल
साधना प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेली” माझी काटेमुंडरीची शाळा ” ही गडचिरोली येथील स्व. गो. ना. मुनघाटे यांची कादंबरी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या 2022- 23 या वर्षा पासून बीए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासायला मिळणार आहे. गोंडवाना विद्यापीठाने शिक्षणमहर्षी स्व गो. ना. मुनघाटे यांच्या कादंबरीची दखल घेतल्याने शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात समाधान व्यक्त केल्या जात आहे. गडचिरोली येथील प्रसिद्ध कवी, नाटककार, कादंबरीकार तथा भूगोल लेखक गो. ना. मुनघाटे लिखित माझी काटेमुंडरीची शाळा ही कादंबरी महाराष्ट्रातील नामांकित शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी बीए च्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली होती, ही गडचिरोली जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असून गोंडवाना विद्यापीठाने सुद्धा सदर कादंबरीचा समावेश बीए च्या अभ्यासक्रमात करावा असा प्रस्ताव *सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर यांनी 27 मार्च 2018 रोजी संपन्न झालेल्या अधिसभेत ठेवला होता.* विद्यापीठाने या प्रस्तावाला तात्काळ मान्यता देऊन तो प्रस्ताव अभ्यास मंडळाकडे वर्ग केला होता. परंतु करोणा काळामुळे या कादंबरीला अभ्यासक्रमात येण्यास वेळ लागला.
सदर कादंबरी लवकर अभ्यासक्रमात यावी म्हणून प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरखेडा येथील मुनघाटे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर यांनी यासंदर्भात विद्यापीठाकडे पाठपुरावा केला होता. आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून गोंडवाना विद्यापीठाने सदर कादंबरी यंदापासून बीए प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात घेतली आहे.
माझी काटेमुंडरीची शाळा ही साधन साधना प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेली कादंबरी हे स्थानिक गडचिरोली येथील कादंबरी कारांनी लिहिलेली व साहित्य मूल्य अधोरेखित करणारी एकमेव कादंबरी आहे.
सदर कादंबरीवर लेखक हेरंब कुलकर्णी, डॉ. रमेश वरखेडे आणि डॉ. नंदकुमार मोरे यांनी सविस्तर लिहिले आहे.साधना प्रकाशनाने ही कादंबरी स्टोरी टेल या ॲपवर सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. या कादंबरीचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतरासाठी आणि चित्रपट निर्मितीसाठी अनेकांनी परवानगी मागितली आहे.
या कादंबरीला *महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट निर्मितीचा 2004 सालचा अण्णाभाऊ साठे हा पुरस्कार* मिळाला आहे . कादंबरीला पूर्व विदर्भ गडचिरोली येथील भौगोलिक पार्श्वभूमी लाभलेली असून *काट्यांच्या वाटेने जाऊनही आपलं आयुष्य फुलासारखं सुगंधी करता येतं हा आदर्श वस्तूपाठ विद्यार्थ्यांना या कादंबरीतून मिळतो. विद्यार्थ्यांच्या मनात विविध अंगी मूल्य पेरण्याच्या दृष्टीने अनेक अंगानी ही कादंबरी उपयुक्त आहे.*
या कादंबरीवर जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशन ने 3000 शिक्षकांची परीक्षा घेतली. याशिवाय वांग्मयीन अंगाने अनेक अभ्यासक व समीक्षकांनी या कादंबरीची चिकित्सा सुद्धा केलेली आहे. एक समर्थ कलाकृती म्हणून महाराष्ट्रभर सदर कादंबरीचा गौरव होत आहे.गोंडवाना विद्यापीठाच्या या निर्णयामुळे स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये आनंद आहे या शब्दात गडचिरोलीतील प्राध्यापकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील गोंड आदिवासींचे जीवन आणि एका ध्येयवादी शिक्षकाची कहाणी असलेल्या या कादंबरीची तेरावी आवृत्ती अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे.
प्रा. शेषराव येलेकर
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क