महाराष्ट्रातील सात अधिकारी व जवानांना संरक्षण अलंकरण सन्मान वायुदल प्रमुख विवेक चौधरी यांना परमविशिष्ट सेवा पदक
Summary
नवी दिल्ली , दि. २३ : उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि उत्कृष्टसेवेसाठी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज वर्ष २०२१ चे संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राचे सुपुत्र वायुदल प्रमुख विवेक चौधरी यांच्यासह राज्यातील सहा अधिकारी व जवानांनाही या सन्मानाने गौरविण्यात आले. संरक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनाच्या […]
नवी दिल्ली , दि. २३ : उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि उत्कृष्टसेवेसाठी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज वर्ष २०२१ चे संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राचे सुपुत्र वायुदल प्रमुख विवेक चौधरी यांच्यासह राज्यातील सहा अधिकारी व जवानांनाही या सन्मानाने गौरविण्यात आले.
संरक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आज तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार -२०२१’ चे वितरण करण्यात आले. सकाळी आणि सायंकाळी आयोजित या पुरस्कार वितरण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख तथा राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते अधिकारी व जवानांना कीर्ती चक्र, शौर्य चक्र, वीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक आदि सन्मानाने गौरविण्यात आले.
चार परम विशिष्ट आणि दोन अतिविशिष्ट सेवा पदक
या समारंभात राज्याचे सुपुत्र वायुदल प्रमुख विवेक राम चौधरी यांना उत्कृष्ट सेवेसाठी परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट जनरल शशांक ताराकांत ऊपासनी, लेफ्टनंट जनरल संजय मनोहर लोंढे, व्हाईस ॲडमिरल मुरलीधर सदाशिव पवार यांनाही उत्कृष्ट सेवेसाठी परम विशिष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आले. लेफ्टनंट जनरल मिलिंद एन. भुरके आणि व्हाईस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांना उल्लेखनीय सेवेसाठी अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आली.
याच समारंभात ४ , मराठा लाइट इन्फ्रंट्रीचे महाराष्ट्राच्या मातीतील मेजर अनिल ऊर्स यांना दुर्दम्य साहसासाठी शौर्यचक्र प्रदान करण्यात आले. वर्ष २०२० च्या जानेवारी महिन्यात जम्मु-काश्मिरमध्ये नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेजर अनिल ऊर्स यांनी कंपनी कमांडर या नात्याने मोहिमेचे नेतृत्व केले होते. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मेजर ऊर्स यांनी दहशतवाद्यांवर हल्ला चढवत तीन दहशत वाद्यांना ठार केले होते.