मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून पाच लाखांची मदत – पालकमंत्री हसन मुश्रीफ
Summary
नाशिक विभागाचे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती अहमदनगर,दिनांक 6 :- जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत दुर्दवी असून या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हा रुग्णालयास भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.दुर्घटना […]
नाशिक विभागाचे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती
अहमदनगर,दिनांक 6 :- जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत दुर्दवी असून या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हा रुग्णालयास भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.दुर्घटना दिवसा घडली असल्याने त्याबद्दल चौकशीनंतर नेमकेपणाने वस्तुस्थिती समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या दुर्दैवी घटनेत मृत्यु पावलेल्याच्या नातेवाईकांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येत असून चौकशीदरम्यान रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजची मदत घेणार असल्याने सत्य बाहेर येईल असे पालकमंत्री म्हणाले. या समितीमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. ज्यांनी हलगर्जीपणा केला असेल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई होईल. दुर्घटनेच्यावेळी रुग्णालयात अनुपस्थित असणाऱ्या संबधितांवरही कारवाई करण्यात येईल. ऱ्हदय पिळवटून टाकणारी अतिशय दुर्देवी घटना असल्याचे ते म्हणाले. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. गेल्या काही काळात स्वत: रुग्णालयाला तीन चार वेळा भेट दिली होती. आरोग्य सेवेसाठी पुरेसे अनुदान शासनाकडून देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. फायर ऑडिटरांच्या सूचनांची दखल घेण्यात येईल तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल असे ते म्हणाले. या घटनेची लवकरात लवकर चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
आगेतील, जखमींवर योग्य उपचार करण्यात येतील आणि त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरिक्षक दीपक पांडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.