अमरावती महाराष्ट्र हेडलाइन

आवास योजनांची कामे तात्काळ पूर्ण करा; गरजूंना घरे उपलब्ध व्हावी – गृह राज्यमंत्री सतेज पाटील

Summary

अमरावती ,दि . 28 : पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा अंतर्गत लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे उपलब्ध व्हावीत. तसेच यासाठी बँकांनी लाभार्थ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, तसेच अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करावीत,  असे सुस्पष्ट आदेश […]

अमरावती ,दि . 28 : पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा अंतर्गत लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे उपलब्ध व्हावीत. तसेच यासाठी बँकांनी लाभार्थ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, तसेच अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करावीत,  असे सुस्पष्ट आदेश गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांनी आज येथे दिले.

 

भारतनेट, म्हाडा, प्रादेशिक परिवहन एस. टी., तसेच आवास योजना यासंबंधी गृहराज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंड्या, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे तसेच संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

 

गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले की, पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा अंतर्गत  घरांसाठी लाभार्थ्यांना बँकांमार्फत त्वरित कर्ज मिळावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जवळपास चोवीसशे घरे बांधून पूर्ण झाली आहेत.  उर्वरित घरांचे बांधकाम सुरू आहे. ते काम त्वरित पूर्ण करण्यात यावे. आवास योजनांची कामे खोळंबता कामा नयेत. या कामांना प्राधान्य देऊन मिशनमोडवर पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 

भारत नेट आणि महानेट या दोन फेजमध्ये राज्याच्या सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यभर राबविला जात आहे. ग्रामपंचायत स्तरावर सर्व शासकीय योजनांबाबत माहिती मिळावी, हा उद्देश यामागे आहे. फायबर ऑप्टिकमुळे 845 ग्रामपंचायतमध्ये  पहिल्या टप्प्यामध्ये 440 आणि  दुसऱ्याटप्प्यातील 399 पैकी 250 ग्रामपंचायती जोडल्या गेल्या आहेत. फायबर ऑप्टिकलचे काही ठिकाणचे काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. याचा फायदा ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात होणार आहे. यात केवळ ग्रामपंचायती नाही तर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा यांनाही जोडण्यात येणार आहे. जिल्हा आणि तालुक्यांना ग्रामपंचायत स्तरावर काही महत्त्वपूर्ण संदेश द्यायचा असल्यास, माहितीची देवाण-घेवाण करावयाची असल्यास यामुळे मदत होईल. फायबर ऑप्टिक आरोग्य केंद्रांना जोडल्यामुळे गावात साथीचे रोग आल्यास अशी माहिती ताबडतोब राज्यस्तरावर देता येणे शक्य होणार आहे. फायबर ऑप्टिकने ग्रामपंचायती जोडणे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायती जोडल्या जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

परिवहन महामंडळाचे उत्पन्न कोविड काळामध्ये कमी झाले आहे. अशावेळी एसटी बसेस ला उत्पन्नाचे साधन असावे म्हणून मालवाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती श्री. पाटील यांनी यावेळी दिली. मेळघाटात पुरेशा प्रमाणात बसफे-या उपलब्ध असाव्यात, यासाठी तेथील आवश्यकता व इतर बाबींचा अभ्यास करून तशी सुविधा धारणी व परिसरात उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *