चिपी विमानतळामुळे कोकणाला मोठा फायदा; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांशी चर्चा राज्यात हवाई वाहतूक सेवा वाढविण्यासाठी विमानतळांच्या विकासात राज्य शासन – नागरी हवाई वाहतूक मंत्रालय समन्वय ठेवणार
Summary
मुंबई दि 7 : राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाबाबत तसेच त्यातील अडचणी सोडविण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी चिपी विमानतळ सुरू झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासच नव्हे तर कोकणाला […]
मुंबई दि 7 : राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाबाबत तसेच त्यातील अडचणी सोडविण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी चिपी विमानतळ सुरू झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासच नव्हे तर कोकणाला मोठा फायदा होईल असे सांगून श्री सिंधिया यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रण दिले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विशेषतः नांदेड, कोल्हापूर, औरंगाबाद येथील विमानतळांवर अधिक क्षमतेने हवाई वाहतूक सेवा सुरू व्हावी जेणेकरून पर्यटक व नियमित प्रवाशांची संख्या वाढेल व या भागांना त्याचा फायदा होईल यादृष्टीने चर्चा केली तसेच काही तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्याची विनंती केली. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होत आहे , त्याचा निश्चितच जिल्ह्याला व राज्याला फायदा होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या बैठकीत नागपूर, जळगाव, अकोला, सोलापूर, गोंदिया, जुहू, अमरावती येथील हवाई वाहतूक आणि दळणवळण वाढविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात राज्य शासन आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाशी अधिक समन्वय वाढविणे तसेच कालबद्ध रीतीने काम करावे यावर चर्चा झाली.
या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक, एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.