मुल ते चंद्रपूर हा महामार्ग ३१ डिसेंबरपर्यंत उत्तम करून जनतेच्या सेवेत रूजु करावा – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश बंगाली कॅम्प चौकाचे सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने त्वरित अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना
चंद्रपूर : -मुल ते चंद्रपूर हा रस्ता वाहतुकीसाठी अयोग्य झाला असून नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता स्ट्रीटलाईट, रोड मार्कींग पेंट व साईन बोर्डसह ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करून जनतेच्या सेवेत रूजु करण्याचे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल ते चंद्रपूर या रस्त्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांसह बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. जयस्वाल, चंद्रपूर वनवृत्ताचे वनसंरक्षक एन. प्रवीण यांच्यासह अन्य अधिका-यांची उपस्थिती होती. चंद्रपूर ते मुल या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत चंद्रपूर शहरात पावणे चार किमी लांबीचा रस्ता येतो. या रस्त्याच्या मध्य भागामध्ये स्टेनलेस स्टील रेलींग व मध्यभागी प्राण्यांच्या प्रतिकृती उभारून रस्त्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी तातडीने अंदाजपत्रक तयार करून राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाला सादर करण्याचे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. या रस्त्यावर बंगाली कॅम्प व वीर सावरकर चौक येथे प्रत्येकी एक असे दोन हायमास्ट लाईट लावण्याबाबत त्यांनी सुचना दिल्या.
चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प चौकाचे सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने सुध्दा अंदाजपत्रक तयार करून राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाला सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. या संदर्भात आपण स्वतः केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांची भेट घेवून मंजूरी साठी विनंती करू असेही ते म्हणाले.
वनक्षेत्रातून जाणा-या रस्त्यावर सुचना देणारे फलक लावण्याच्या दृष्टीने वनखात्यासह चर्चा करून कार्यवाही करण्याबाबत आ. मुनगंटीवार यांनी सुचित केले.चंद्रपूर ते मुल या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक सुचारू व्हावी, अपघात घडू नये यादृष्टीने रेडीयम पट्टया, रिफ्लेक्टर, झाडांवर रेडीयम लावण्याच्या दृष्टीने आवश्यक उपायययोजना करण्यात याव्या अशा सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. आ. मुनगंटीवार यांनी निर्देशित केल्याप्रमाणे संबंधित कामांची अंदाजपत्रके तातडीने राष्ट्रीय महामार्ग विभागाला सादर करण्यात येईल तसेच ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुल ते चंद्रपूर हा महामार्ग आवश्यक उपाययोजनांसह जनतेच्या सेवेत रूजु करण्यात येईल, असे आश्वासन अधिक्षक अभियंता श्री. जयस्वाल यांनी दिले. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, स्थायी समिती सभापती रवि आसवानी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा
न्युज रिपोर्टर
महाराष्ट्र राज्य….