जनतेच्या आशा-आकांक्षाचे प्रतिबिंब अर्थसंकल्पातून व्यक्त व्हावे; लोकप्रतिनिधींनी आवडत्या विषयांचा अभ्यास करावा – उद्योगमंत्री सुभाष देसाई वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रामार्फत “राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात..” दोन दिवसीय चर्चासत्र
Summary
मुंबई, दि. 5 : जनतेप्रती कृतज्ञता या सभागृहातील कामकाजाच्या माध्यमातून होते. जनतेच्या आशा-आकांक्षाचे प्रतिबिंब अर्थसंकल्पातून व्यक्त व्हायला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी आपल्या कामातून जनतेप्रति कृतज्ञता दाखवून द्यावी, त्यासाठी आपल्या आवडत्या विषयाचा सखोल अभ्यास करुन त्यावर सभागृहात व्यक्त व्हावे, माझ्या मतदारसंघासाठी काय मिळाले, […]
मुंबई, दि. 5 : जनतेप्रती कृतज्ञता या सभागृहातील कामकाजाच्या माध्यमातून होते. जनतेच्या आशा-आकांक्षाचे प्रतिबिंब अर्थसंकल्पातून व्यक्त व्हायला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी आपल्या कामातून जनतेप्रति कृतज्ञता दाखवून द्यावी, त्यासाठी आपल्या आवडत्या विषयाचा सखोल अभ्यास करुन त्यावर सभागृहात व्यक्त व्हावे, माझ्या मतदारसंघासाठी काय मिळाले, माझ्या खात्यात किती तरतूद झाली. कुणाला काय मिळाले, त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले तर त्याला यशस्वी अर्थसंकल्प म्हणता येईल, असे, विचार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे मांडले.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे ‘राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात…’ या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आजच्या दिवसाच्या प्रथम सत्रात मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल करण्यात आला होता.
यावेळी उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, वि. स पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे सल्लागार आमदार हेमंत टकले, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने व इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या चर्चासत्रात विधान सभा आणि विधान परिषदेतील सदस्य प्रत्यक्ष आणि ऑनलाईन उपस्थितीत होते.
दरडोई उत्पन्न वाढावे – राहणीमान उंचवावे
श्री. देसाई म्हणाले की, अर्थसंकल्पला एक चौकट असते. राज्यपाल किंवा घटनेने घालून दिलेले सूत्र असते. या सुत्रानुसार विविध योजनांसाठी निधी वाटप केला जातो. सत्तापक्ष म्हणून काम करताना राज्यातील प्रत्येक घटकांचा विचार केला जातो. रोजगार वाढविणे, दरडोई उत्पन्न वाढीवर भर दिला जातो. नागरिकांना नीट जगता आले पाहिजे, राहणीमान उंचावेल याची दखल अर्थसंकल्पातून घेतली जाते. या सर्व घटकांचा प्रतिबिंब अर्थसंकल्पातून उमटत असले. ते उमटयलाच पाहिजे.
दिलेले वचन पूर्ण करायचे असा बाळासाहेब यांचा आग्रह असायचा. त्यामुळे शिवसेनेचा वचननामा संक्षिप्त असतो. पाच वर्षांत त्याचा आढावा घेतला गेला पाहिजे. मतदारसंघासाठी काय आश्वासन दिले होते, त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पाच्या भाषणाचे स्वरुप मतदारसंघापुरते न राहता. हा अर्थसंकल्प पूर्ण राज्याचा असतो. आमदार हा राज्याचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या विचारातून राज्यव्यापी विचार व्यक्त होण्याची गरज आहे.
आवडीच्या विषयावर वाचन करावे
राज्याची स्थापना झाल्यापासून विविध ४० खाती तयार झाली आहेत. काहीजण सतत एखाद्या विषयांवर मांडणी करत असतात. नवीन आमदारांनी आपल्या आवडीच्या विषयांवर वाचन करत राहिल्यास त्या विषयावर प्रभूत्व मिळवता येईल. बोलण्यासाठी आग्रह धरणे, भांडणे गरजेचे आहे. मात्र, राजदंड पळविणे योग्य नाही. त्यातून काही साध्य होत नाही. त्यापेक्षा अध्यक्ष किंवा सभापतींच्या सूचनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. सभागृहात भाषण झाले किंवा नाही, यापेक्षा आपला विषय मार्गी लागेल यावर लक्ष केंद्रीत करावे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला पाहिजे.
घोषणेतून संधी शोधावी
सभागृहात बोलण्याची संधी मिळाल्यानंतर तिचे सोने झाले पाहिजे. संधीची माती होता कामा नये, सरकारच्या प्रत्येक घोषणांकडे लक्ष द्यायला पाहिजे. सरकारच्या घोषणांचा मागोवा घेतला तर त्यातून संधी मिळते. आपले मुख्यमंत्री निसर्गप्रेमी आहेत. पर्यावरण आणि वनप्रेमी आहेत. एकही झाड कापू द्यायचे नाही. वनखात्याची एक योजना आहे. वनीकरणाचे नवे धोरण आले आहे. तीस टक्के जागा वनासाठी राखीव ठेवण्याचे नियम करण्यात आले आहे. उद्योग उभारताना ३० टक्के झाडे लावण्याची अट घालण्यात आली आहे. या क्षेत्रात मोठी संधी आहे. आपल्या संस्था असतील तर यात काम करता येईल. सात वर्षांत ही झाडे जगली पाहिजेत, असा उपक्रम आहे. त्यास चांगला निधीही मिळतो.
विभागाच्या योजनांचा फायदा घ्यावा
अनेक विभाग योजना जाहीर करतात, त्यांचा अभ्यास करावा. उद्योग विभागाच्यावतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यातून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध आहेत. यासाठी पाठपुरावा करत राहणे गरजेचे आहे. काहीजण उत्साही असतात. काही लोक मेहनती असतात. या योजनेच्या माध्यमातून रोजगार मिळतो. उत्पादन क्षेत्रासाठी ५० लाख तर सेवाक्षेत्रासाठी १० लाखांची योजना आहे. अशा योजनांचा लाभ घेण्याची गरज आहे.
अर्थंसंकल्पाच्या माध्यमांतून आपला मतदारसंघ कसा सुदृढ करता येईल. याकडे लक्ष दिले पाहीजे. निवडून आल्यानंतर भ्रमनिरास होतो. आपण खूप आश्वासन देतो, परंतु प्रत्यक्ष काम करत असताना ते पूर्ण करताना अडचणी येतात. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत आपली कामे पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत.
संस्थेच्या माध्यमातून कामे करावीत
आपल्या मतदार संघात केलेल्या कामांची श्री.देसाई यांनी थोडक्यात माहिती दिली. गोरेगाव मतदारसंघात क्रीडांगण, रक्तपेढी, ग्रंथालय आदी उपक्रम सुरू केले. प्रबोधन संस्था सुरू केली. त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली. एखादं मंडळ, संस्था असणे गरजेचे आहे. आपली संस्था असली तर जर काही कारणाने निवडणूक लढता आली नाही तरी लोकांचा प्रतिनीधी म्हणून कामं करण्यासाठी अशा संस्थेच्या ठिकाणी बसायला हक्काची जागा मिळते.
कार्यक्रमाचा समारोप करतांना श्री.देसाई यांनी कवी सुरेश भट यांची ‘बदलवून टाकवू महाराष्ट्र सारा…’ ही कविता वाचून दाखवली. अनंत अडचणीचा सामना करत असताना आपण काम करतो आहोत. त्यासाठी महाराष्ट्र बदलायचा आहे. कवितेप्रमाणे महाराष्ट्राचे ध्येय हे आपले ध्येय असावे, असेही श्री.देसाई म्हणाले.