महाराष्ट्र सांगली हेडलाइन

सहकारी बँकानी शासनाच्या निर्देशानुसार नियमाच्या चाकोरीमध्ये राहून कारभार करावा – पालकमंत्री जयंत पाटील

Summary

सांगली दि.13 (जि.मा.का) : सहकारी संस्थांच्या माध्यमातून उद्धार व्हावा, यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वैकुंठलाल मेहता यांनी सहकाराचे रोपटे लावले. आता हे सहकाराचे रोपटे वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. विना सहकार नाही उद्धार या ब्रिद वाक्याप्रमाणे समाजाची प्रगती झाली. यापूर्वी सहकारातील अर्बन […]

सांगली दि.13 (जि.मा.का) : सहकारी संस्थांच्या माध्यमातून उद्धार व्हावा, यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वैकुंठलाल मेहता यांनी सहकाराचे रोपटे लावले. आता हे सहकाराचे रोपटे वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. विना सहकार नाही उद्धार या ब्रिद वाक्याप्रमाणे समाजाची प्रगती झाली. यापूर्वी सहकारातील अर्बन व नागरी बँका चालविणे हे त्या त्या मंडळांच्या अधिकारात होते. त्यावर नाबार्डचे नियंत्रण होते. पण सद्यस्थितीत हे सर्व अधिकार रिझर्व्ह बँकेच्या अधिकारात गेले आहे. तसेच बँकांबाबत धोरणेही बदलत आहेत. त्याप्रमाणे सहकारी क्षेत्रातील बँकांही योग्यरितीने न चालल्यास त्यांचे खासगीकरण होऊ शकते. त्यामुळे सहकारी तत्त्वावरील बँकांनी शासनाच्या निर्देशानुसार व सूचनांनुसार नियमांच्या चाकोरीमध्ये राहून कारभार करावा. तरच येत्या काळात सहकारी बँका टिकतील, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील केले.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इस्लामपूर येथील विभागीय नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष संग्राम देशमुख, प्रांताधिकारी डॉ. संतप खिलारी, तहसिलदार रविंद्र सबनीस, पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, इस्लामपूरचे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. डब्ल्यु. कडू-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सहकारामध्ये प्रगतीची मोठी ताकद आहे. सहकारी तत्त्वावर चाललेल्या संस्थांच्या मध्यमातून विकास तळगाळापर्यंत पोहचविता येतो. सांगली जिल्ह्यानेही सहकाराच्या माध्यमातून प्रगती साधली आहे. ही प्रगती कायमस्वरुपी टिकवून ठेवण्यासाठी सहकार टिकला पाहिजे. यासाठी चाकोरीत राहुनच, अटी शर्तीच्या अधिन राहून, नियमांचे योग्यरितीने पालन करुन कारभार झाला पाहिजे. जर सहकाराचे खासगीकरण झाले. तर खासगी यंत्रणा समाजाचे शोषण करतील. सहकार क्षेत्रातील बँका या तळगाळापर्यंत काम करण्यासाठी कार्यरत आहेत. यातीलच एक महत्त्वाची बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक असून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने या सर्व बाबींचे पालन करुन चांगली प्रगती साधली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने आर्थिक क्षमता चांगल्या पद्धतीने निर्माण करण्यावर भर दिला आहे. असे असले तरी जगाच्या पाठीवर ई-बँकिंग आणि आधुनिकीकरणाला जास्त महत्त्व आहे. येत्या काळात स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी काळानुरुप बदल स्वीकारले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने इस्लामपूर शहरात उभारलेली विभागीय कार्यालयाची इमारत ही इस्लामपूरच्या वैभवात भर टाकणारी असून या बँकेतून ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतील. खासगी बँकापेक्षाही अत्यंत सुदर आणि सुबक किंबहुना त्यापेक्षा चांगली व अत्याधुनिक सोईने युक्त अशी ही वास्तु या ठिकाणी अस्तिवात आली. यासाठी बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ यांचे मी अभिनंदन करतो. असे सांगून ते म्हणाले, येणाऱ्या काळात बँकेची अशीच प्रगती होत राहिल आणि समाजाला आर्थिक सक्षम करण्याचे काम होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते तांदूळवाडी ग्रामपंचायतीचे भूमीपूजन

तांदूळवाडी ता-वाळवा येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था या ग्रामीण भागाचा कणा असून ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारती अत्याधुनिक असणे ही काळाची गरज झाली आहे. तांदुळवाडीत उभारण्यात येणारे ग्राम सचिवालयातून स्थानिक नागरिकांना सर्व सोई सुविधा तातडीने उपलब्ध होतील. त्याच बरोबर गावाच्या विकासासाठी त्याचे बहुमोल योगदान राहील. असा मला विश्वास वाटतो. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, प्रांताधिकारी डॉ. संतप खिलारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य देवराज पाटील, सरपंच रमेश पाटील, उपसरपंच शोभा कांबळे, ग्रामस्थ अदी मान्यवर उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *