भारत निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना; ४ ऑक्टोबर रोजी मतदान
मुंबई, दि. 9: भारत निवडणूक आयोगाने देशातील विविध कारणांनी रिक्त झालेल्या राज्यसभेच्या पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. स्व. राजीव शंकरराव सातव यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या राज्यातील एका जागेचाही यात समावेश आहे. या पोटनिवडणुकीसाठी बुधवार दि. 15 सप्टेंबर, 2021 रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे.
स्व. सातव यांच्या निधनाने मुक्त झालेल्या जागेची मुदत दि. 2 एप्रिल, 2026 पर्यंत आहे. या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केल्याच्या दिनांकापासून बुधवार दि. 22 सप्टेंबर, 2021 पर्यंत नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 23 सप्टेंबर रोजी केली जाणार असून उमेदवारांना सोमवार दि. 27 सप्टेंबर, 2021 पर्यंत नामनिर्देशन मागे घेता येईल. सोमवार दि. 4 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 9 वा. ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार असून त्याच दिवशी सायं. 5 वा. मतमोजणी केली जाणार आहे.