विज्ञानाच्या क्षितिजावर महाराष्ट्र जगात अग्रेसर ठरेल – ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.शेखर मांडे महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला
Summary
नवी दिल्ली, दि. ८ : इतिहास व वर्तमानात महाराष्ट्राची विज्ञान क्षेत्रातील प्रगती अतुलनीय असून येत्या काळात विज्ञानाच्या क्षितिजावर महाराष्ट्र भारतासह जगात अग्रेसर राज्य ठरेल, असे मत वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक तथा ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. शेखर मांडे यांनी आज व्यक्त केले. “महाराष्ट्राचे विज्ञान क्षेत्रातील योगदान” विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने […]
नवी दिल्ली, दि. ८ : इतिहास व वर्तमानात महाराष्ट्राची विज्ञान क्षेत्रातील प्रगती अतुलनीय असून येत्या काळात विज्ञानाच्या क्षितिजावर महाराष्ट्र भारतासह जगात अग्रेसर राज्य ठरेल, असे मत वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक तथा ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. शेखर मांडे यांनी आज व्यक्त केले.
“महाराष्ट्राचे विज्ञान क्षेत्रातील योगदान” विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ५२वे पुष्प गुंफताना डॉ. मांडे बोलत होते.
जगाला बीजगणिताची ओळख करून देणारे थोर गणितज्ज्ञ भास्कराचार्यांपासून विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय कार्य केले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशात सुरु झालेल्या पहिल्या ‘इम्पेरियल बॅक्टोरोलॉजीकल लेबॉरेर्टरी’सह विज्ञान क्षेत्रातील महत्वाच्या संस्था राज्यात कार्यरत आहेत. गुरुत्वीय लहरींवरील संशोधनासाठी जागतिक पातळीवरील महत्वाची ‘लायगो वेधशाळा’ही राज्यात लवकरच उभारण्यात येणार आहे. देशातील विज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी असल्याची ओळख राज्याने दिली असून भविष्यातही महाराष्ट्र हे भारतासह जागाचे मार्गदर्शन करेल ,असा विश्वास डॉ. मांडे यांनी व्यक्त केला.
१२व्या शतकात थोर गणितज्ज्ञ भास्कराचार्यांनी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी मंदिर येथे बीजगणितावरील महत्त्वाचे निबंध लिहिले. तेव्हांपासूनच जगात बीजगणिताची सुरुवात झाल्याचे मानले जाते, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाची बाब असल्याचे डॉ. मांडे यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात प्लेगची साथ आली तेव्हा लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने प्लेग आजारावर लस शोधण्याच्या केलेल्या आव्हानामुळे पुण्यात देशातील पहिली ‘इम्पेरियल बॅक्टोरोलॉजीकल लेबॉरेर्टरीची’ स्थापना झाली. महाराष्ट्रात सुरु झालेल्या या प्रयोगशाळेचे अनुकरण देशाच्या अन्य राज्यांनीही केले.आज पुण्यातील इम्पेरियल लेबॉर्टरीचे रुपांतर इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिटयूट इज्जतनगर (उ.प्र.) असे झाले आहे.
वैज्ञानिक शिक्षणातही राज्याने नेहमीच पुढाकार घेतला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, कोल्
राज्यात विज्ञान क्षेत्रात कार्यरत महत्वाच्या संस्था आहेत. यात प्रमुख संस्थांचा विचार करता थोर शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांनी मुंबईतील ट्रॉम्बे भागात स्थापन केलेल्या भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे नाव अग्रक्रमाणे घेतले जाते. आधुनिक भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम याच संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर राबविला गेला. अणुऊर्जा विभागाचे मुख्यालयही मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे स्थित आहे.
मुंबईतील हाफकिन ही महाराष्ट्र शासनाची संस्था, देशाचा गौरव वाढवित असल्याचे सांगत डॉ. मांडे म्हणाले, या संस्थेच्या माध्यमातूनच देशात सर्पंदंशांवरील बहुतांश लस निर्मितीचे कार्य केले जाते. पुण्यात १२ वर्षांपूर्वी स्थापन झालेली ‘इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायंस एज्युकेशन एँड रिसर्च’ ही संस्था महत्वाची कामगिरी पार पाडत आहे.
पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून झालेले कार्यही राज्यासह देशासाठी गौरवास्पद असल्याचे डॉ. मांडे म्हणाले. या विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविणारे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ आणि त्यांचे सुपूत्र प्रसिध्द पर्यावरणतज्ज्ञ माधवराव गाडगीळ यांनी बहुमूल्य कार्य केले. प्रा. व्ही.जी. भिडे यां
खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी खगोलशास्त्र व खगोलभौतिकी विषयाला समर्पित अशा आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र व खगोलभौतिकी केंद्राची (आयुका)
वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेची (सीएसआयआर) देशातील पहिली वहिली प्रयोग शाळा, प्रख्यात नॅशनल केमिकल लेबॉरेर्टरी देखील पुणे येथे स्थापन झाली होती. भारतासह जगात आजही या संस्थेला मानाचे स्थान प्राप्त असल्याचे डॉ. मांडे यांनी सांगितले.
पुणे येथील ‘नॅशनल रिसर्च ऑफ व्हायरॉलॉजी’ ही देशातील अग्रगण्य संस्था कोरोना महामारीच्या काळात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. देशात उत्पन्न होणाऱ्या विषाणूजन्य रोगांवरील संशोधनात ही संस्था महत्वाची भूमिका पार पाडत आहे. पुण्यातच राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) असून या संस्थेच्या संचालकपदी सतत ७ वर्ष कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली होती व ही खूप गौरवास्पद बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारताला जेव्हा सर्व देश कोशिका देण्यास नकार देत होते तेव्हा १९८८ मध्ये डॉ उल्हास वाघ व पुणे विद्यापीठाचे प्रा. मोडक यांच्या पुढाकाराने ही संस्था स्थापन झाली व आज संस्थेची ख्याती आज संपूर्ण जगात पसरली असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यासाठी अभिमानास्पद ठरेल असा ‘लायगो वेधशाळा’ हा गुरुत्वीय लहरींवरील संशोधनासाठी जागतिक पातळीवरील महत्त्वाचा भारत सरकारचा प्रकल्प येत्या काळात महाराष्ट्रात उभारला जाणार आहे. भारतातील गुरुत्वीय लहरींविषयीचे सैंध्दांतिक कार्य बंग्ळुरु येथे प्रा. विश्वेश्वरैय्या यांनी केले तर यासंबंधी महत्वाचे सिंध्दांतांवर पुण्यात कार्य झाले असल्याचे डॉ .मांडे म्हणाले.
भारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘कपासी संशोधन संस्था’ नागपूर येथे कार्यरत आहे. तसेच, संत्रा फळावरील संशोधन संस्थाही नागपूरमध्ये आहे. वर्धा येथे ‘सेंटर फॉर सायंस फॉर व्हिलेजेस’ ही ग्रामीण भागात विज्ञानाचा प्रसार व्हावा व विज्ञानाचा फायदा पोहचविण्याच्यादृष्टीने स्थापन झालेली संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे वडील प्रा. चिंतामणी मांडे यांनी या संस्थेचे प्रमुख म्हणून अनेक वर्ष कार्य पाहिल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
नागपूर येथील विश्वैश्वरय्या नॅशनल इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या प्रतिष्ठीत अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेवून येथील विद्यार्थी देश-विदेशात कार्यरत आहेत. महान शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण यांचे नागपूरला वास्तव्यास होते त्यांचे बरेच कार्य नागपूर विद्यापीठात झाले आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाने पीएचडी बहाल केली असल्याचेही डॉ. मांडे म्हणाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे शिक्षण व विज्ञान क्षेत्रात उत्तम कार्य झाले आहे. महाराष्ट्राची विज्ञान क्षेत्रातही उत्तम वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्र भारताचे नव्हे तर पूर्ण जगाचे मार्गदर्शन करेल असा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच, युवा वैज्ञानिकांनी विज्ञानाच्या माध्यामातून जगाच्या उध्दारासाठी एकत्र येवून कार्य करावे, असे आवाहन डॉ. मांडे यांनी केले.