कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी निधी उपलब्ध; प्रस्ताव तात्काळ सादर करा – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
Summary
मुंबई, दि. 5 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील समाधीस्थळाच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध असून याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले. सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समाधीस्थळाचे नूतनीकरण व […]
मुंबई, दि. 5 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील समाधीस्थळाच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध असून याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले.
सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समाधीस्थळाचे नूतनीकरण व इतर कामांसाठी निधी मिळणेबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीला कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सहसचिव दि.रा.डिंगळे, कोल्हापूर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे म्हणाले, कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण व इतर कामांसाठी शासनाकडे निधी उपलब्ध आहे. ही विकासकामे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेंतर्गत करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. हे समाधीस्थळ लवकरात लवकर होणे गरजेचे असून तसा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ पाठवावा, असे निर्देश श्री.मुंडे यांनी प्रशासनाला दिले.