BREAKING NEWS:
नई दिल्ली महाराष्ट्र हेडलाइन

कृतिशील सेनानी साने गुरूजींचे चरित्र महाराष्ट्राला प्रेरणादायी : सुभाष वारे महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला

Summary

नवी दिल्ली, दि. 12 : कृतिशील  सेनानी साने गुरूजींचे चरित्र महाराष्ट्राला सदैव प्रेरणादायी असल्याचे मत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी आज मांडले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ‘सेनानी साने गुरूजी’ या  विषयावर 57 वे पुष्प गुंफताना श्री. वारे  बोलत होते. […]

नवी दिल्ली, दि. 12 : कृतिशील  सेनानी साने गुरूजींचे चरित्र महाराष्ट्राला सदैव प्रेरणादायी असल्याचे मत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी आज मांडले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ‘सेनानी साने गुरूजी’ या  विषयावर 57 वे पुष्प गुंफताना श्री. वारे  बोलत होते.

श्री. वारे म्हणाले, महाराष्ट्राला 60 वर्षे झालेली आहेत. महाराष्ट्राच्या मातीची मशागत संतांनी, समाजसुधारकांनी, क्रांतीकारकांनी केलेली आहे.  या यादीमध्ये अत्यंत महत्त्वाचे नाव साने गुरूजी यांचे आहे. साने गुरूजी यांचे स्मरण करताना श्यामची आई या पुस्तकाचा उल्लेख आणि  ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे…..’ याचा उल्लेख केल्याशिवाय पूर्णत्व प्राप्त होत नाही. मात्र,  साने गुरूजी एक चांगले साहित्यिकही होते. त्यांनी बालकांसाठीचे  साहित्य  मोठ्या प्रमाणात निर्माण केले. यासह त्यांनी  इस्लामी संस्कृती  आणि भारतीय संस्कृती या पुस्तकांमधून तत्वचिंतक साने गुरूजींचे दर्शन घडते. साने गुरूजी यांनी मांडलेली आंतर भारती संकल्पनेची महती श्री. वारे यांनी यावेळी सांगितली. सेनानी साने गुरूजींबद्दल फार कमी लोकांना माहिती असल्याचे श्री. वारे यावेळी म्हणाले.

मुळात साने गुरूजी संवेदनशील असल्यामुळे सृजनशील होते, असे सांगत श्री. वारे पुढे म्हणाले,   त्यामुळेच नवनीर्मिती करण्याची  क्षमता साने गुरूजी मध्ये होती. संवेदनशीलतेतूनच अवरूध्द झालेल्या वाटा  साने गुरूजी  यांनी दूर केल्या.    त्यामुळे साने गुरूजी हे सेनानी साने गुरूजी झाले. असे, श्री. वारे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न देशापुढे यावे म्हणून साने गुरूजी यांनी 1936 मध्ये  ‘शेतकऱ्यांसाठी  कामकऱ्यांसाठी, लावू पणाला प्राण आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान…….’ हे गाणे लिहीले होते. अशी माहिती श्री. वारे यांनी यावेळी दिली.  साने गुरूजी यांचा जन्म हा कोकणाचा मात्र, त्यांची कर्मभूमी ही उत्तर महाराष्ट्र ठरली. जळगावच्या एका वसतिगृहाचे ते काम करीत असल्याचे श्री. वारे यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील कारखान्यातील कामगारांना न्याय मिळावा म्हणुन साने गुरूजींनी आंदोलन केले होते या आंदोलनाला महात्मा गांधीजींनी ही पाठिंबा दिला होता, असे सांगून श्री. वारे पुढे म्हणाले, कामगार शक्ती, कामगार वर्ग जे काम करीत असतो त्याच्या कामाला, घामाला  न्याय मिळावा यासाठी लढताना भूमिका मांडतांना कारखान्यातून उत्पादन होणाऱ्या मालात कारखान्याच्या मालकाने भांडवल गुंतले असते, ज्याची जमीन  कारखान्यासाठी वापरली त्याची गुंतवणूक असते.  कारखान्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री, बुद्धीचेही एक महत्व असते. यासर्वांमध्ये कामगार घाम गाळून जे उत्पादन तयार करतात त्याचेही महत्व असते हे विसरता कामा नये, म्हणून नफ्यातील योग्य हिस्सा कामगारांना मिळायला हवा. असा आग्रह साने गुरूजी यांचा होता. कामगारांचे कुंटुंब जर आनंदात राहिले तर कारखान्यात उत्पादन होणाऱ्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल . अशी व्यापक भूमिका साने गुरूजींची कामगाऱ्यांच्या लढ्‍ निमित्त मांडलेली असल्याचे आपल्याला दिसते.  या आंदोलनाच्या निर्वाणीच्या वेळी साने गुरूजींनी आपले आयुष्य पणालाही लावले असल्याचे श्री. वारे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या हीरक मोहोत्सवी वर्षात साने गुरूजींची आठवण करीत असताना त्यांनी केलेल्या कामातून प्रेरणा घेऊन असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी योग्य निर्णय घ्यावे असा सल्लाही श्री. वारे यांनी यावेळी दिला.

मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून  8 ऑगस्ट  1942  ला ‘चले जाव आंदोलन’ सुरू झाले. त्याच रात्री ब्रिटीश पोलिसांनी नेत्यांची धरपकड सुरू केली. महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, जगजीवनराम अशा सगळ्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर देशभरातील समाजवादी नेत्यांनी हे आंदोलन पुढे ठेवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. उत्तर भारतातून डॉ. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण तसेच महाराष्ट्रातून साने गुरूजी, शिरूभाऊ लिमये,  एस. एम. जोशी,  यांनी आंदोलन पुढे नेले होते. त्या काळात साने गुरुजी भूमिगत राहून, संकेतवजा शब्द वापरून जनतेमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवण्याचे कार्य करीत राहिले. यादरम्यान ब्रिटीश पोलिसांकडून त्यांचा अमानुष छळ केला. या सर्वांना झुगारूनही त्यांनी चले जाव चे आंदोलन  पुढे नेले. ज्या माऊलीने साने गुरूजींवर सामाजिक समतेचे संस्कार घडविले. त्याच माऊलीने संघर्षशीलतेची वृत्तीही साने गुरूजी यांच्यामध्ये रूजवली असल्याचे यावरून दिसते, असे श्री. वारे म्हणाले.

साने गुरूजी यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले करण्यासाठीचे आंदोलन. यावेळी सेवादलाचे  प्रमुख एस.एम. जोशी यांनी साने गुरूजी यांना उपषोण पुढे ढकलण्यात यावे असा सल्ला दिला होता. दरम्यान लोकांमध्ये जागरूकता  निर्माण करण्याचे काम सेवा दलाच्या कलापथकाद्वारे करण्यात आल्याची माहिती श्री. वारे यांनी यावेळी दिली.

साने गुरूजी यांनी पंढरपुरातून उपोषण सुरू केले.  यावेळी उपोषणादरम्यान त्यांनी जनतेला स्वतंत्र भारत कसा असावा याची भूमिका मांडली होती. यामध्ये सर्व जाती, जमाती, वर्गाचे प्रतिनिधीत्व त्यामध्ये असणार आहे यातूनच  बलसागर राष्ट्र होऊ शकणार असल्याचे साने गुरूजी म्हणाले होते. साने गुरूजींच्या उपोषणाचा परिणाम म्हणून विठ्ठल मंदिर संर्वासाठी खुले करण्यात आले होते. हे यश सेनानी साने गुरूजींना मिळाले, असल्याचे श्री. वारे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *