विद्युत वाहिन्यांची देखभाल ड्रोन कॅमेरामुळे अधिक प्रभावी – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीमध्ये झाले प्रात्यक्षिक
Summary
नागपूर, दि. 1 : विद्युत वाहिन्यांची देखभाल व निगराणी ड्रोन कॅमेरामुळे अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने आयोजित केलेल्या अति उच्चदाब वाहिन्यांच्या सर्वेक्षणासाठी वापरत असलेल्या ड्रोन कॅमेराचे प्रात्यक्षिक कोराडी औष्णिक वीज प्रकल्प […]
नागपूर, दि. 1 : विद्युत वाहिन्यांची देखभाल व निगराणी ड्रोन कॅमेरामुळे अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने आयोजित केलेल्या अति उच्चदाब वाहिन्यांच्या सर्वेक्षणासाठी वापरत असलेल्या ड्रोन कॅमेराचे प्रात्यक्षिक कोराडी औष्णिक वीज प्रकल्प अंतर्गत विद्युत विहार वसाहत कोराडी येथील पटांगणावर आयोजित करण्यात आले. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीमध्ये या ड्रोन कॅमेराचे प्रात्यक्षिक झाले. ड्रोन कॅमेराचा वापर अतिउच्च दाब वाहिन्यांच्या देखभाली करिता बिघाड शोधण्याचे साधन म्हणून कसा वापर करता येते. याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यामुळे होणारे फायद्याची तसेच सुलभतेची माहिती देण्यात आली.
यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, पारंपरिक पद्धतीपेक्षा नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अति उच्चदाब वाहिन्यांची निगराणी व देखभाल करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने पारेषण कंपनीने उचललेले हे पाऊल निश्चितच अभिनंदनीय आहे. राज्यभरात विजेचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी अति उच्चदाब वाहिन्यांची भूमिका फार महत्त्वाची राहत असल्याने या वाहिन्यांची देखभाल व निगराणी आवश्यक आहे. यामुळे विद्युत हानी सुद्धा कमी होण्याची शक्यता असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
या ड्रोन कॅमेरामुळे होणाऱ्या फायद्याची माहिती महापारेषणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके यांनी यावेळी दिली. या प्रात्यक्षिकावेळी महानिर्मितीचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे, राजू घुगे, राजकुमार तासकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.