कोरोनाबाधितांची घटणारी रूग्णसंख्या दिलासादायक निर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल : पालकमंत्री छगन भुजबळ
Summary
नाशिक दि. 30 (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासनाच्या टास्क फोर्समार्फत निर्बंधांच्या शिथिलतेबाबत घेण्यात येणारा निर्णय अंतिम असेल, त्या निर्णयाच्या अनुषंगानेच जिल्हास्तरावर सर्व नियम लागू करण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची घटणाऱ्या रुग्णसंख्या दिलासादायक आहे. परंतू संसर्गाची भिती अद्यापही पूर्णत: […]

नाशिक दि. 30 (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासनाच्या टास्क फोर्समार्फत निर्बंधांच्या शिथिलतेबाबत घेण्यात येणारा निर्णय अंतिम असेल, त्या निर्णयाच्या अनुषंगानेच जिल्हास्तरावर सर्व नियम लागू करण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची घटणाऱ्या रुग्णसंख्या दिलासादायक आहे. परंतू संसर्गाची भिती अद्यापही पूर्णत: संपलेली नसल्याने सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात निर्बंध शिथील करणे तसेच शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबाबत मंत्रीमंडाळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. याबाबत राज्य शासनाच्या टास्क फोर्सअंतर्गत घेण्यात येणारा निर्णय जिल्ह्यात लागू करण्यात येईल. तोपर्यंत जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधांत कोणत्याही स्वरूपाचे बदल करण्यात आलेले नसून सर्व निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याकरीता लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्याला पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात आवश्यकतेनुसार लसी उपलब्ध झाल्यास त्याअनुषंगाने लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मीती करणाऱ्या एकूण 25 ऑक्सिजन प्रकल्पांची साधन सामुग्री प्राप्त झाली असून हे प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सोमवारी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांसोबत बैठक घेवून नियोजन करावे, असे बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले की, जिल्ह्यात आतापर्यंत 25 टक्के म्हणजेच साधारण 18 लाख 30 हजार 27 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच म्युकर मायकोसीसच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत असून आजअखेर 58 रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना गरजेचे असणारे इंजेक्शन देखील आवश्यकत्या प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 2 टक्के असून मृत्यूदर 2.11 टक्के आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या शाळांपैकी आजपर्यंत 277 शाळा सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी पालकमंत्री यांना दिली.
जीवनरक्षा पुरस्काराचे वितरण
बैठकीनंतर महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत नाविन्यपूर्ण कार्य, सामाजिक सेवा, शैक्षणिक, क्रीडा, कला व संस्कृती, शुरता या क्षेत्रात असमान्य कर्तृत्व केल्याबद्दल जीवनरक्षा पुरस्कार देण्यात येतो. नाशिक जिल्ह्यातील दिव्या सोमनाथ खळे या 13 वर्षीय मुलीला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या जीवनरक्षा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.