BREAKING NEWS:
कृषि चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

Summary

चंद्रपूर,दि. 29 जुलै : जिल्ह्यात 23 आणि 24 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्याकरीता राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी बल्लारपूर तालुक्यातील चारवट, […]

चंद्रपूर,दि. 29 जुलै : जिल्ह्यात 23 आणि 24 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्याकरीता राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी बल्लारपूर तालुक्यातील चारवट, हडस्ती येथे भेट दिली.

शेतक-यांशी संवाद साधतांना पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीनचे नुकसान झाले आहे. अंदाजे 10 हजार हेक्टरला नुकसानीचा फटका बसला असून हा आकडा पुढे वाढूही शकतो. अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या जमिनी खरवडल्या गेल्या. त्यामुळे मदतीची शेतक-यांची मागणी आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांना त्वरीत मदत करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शासन शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच शासन मदत जाहीर करेल.

विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वाशिम व इतर ठिकाणी सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाले असून पंचनामे झाल्यानंतर जे देय आहे, अशी मदत शेतक-यांना देण्यात येईल. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विदर्भातील शेतक-यांनासुध्दा नुकसान भरपाई मिळणार आहे, असे पालकमंत्र्यांनी आश्वस्त केले.

यावेळी हडस्ती येथील शेतकरी श्री. शेंडे यांनी पालकमंत्र्यांना माहिती देतांना सांगितले की, वर्धा नदीच्या पुलावरून येणा-या पाण्याच्या प्रवाहामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. समोरच इरईचा संगम असल्याने वर्धा नदी फुगली की बॅकवॉटर शेतात येते. यावेळी पालकमंत्र्यांनी इतरही शेतक-यांशी संवाद साधला.

पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार, प्रकाश देवतळे यांच्यासह गावपातळीवरील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *