चांदूरबाजार येथे औद्यागिक क्षेत्र विकसित करावे; ग्रामाद्योग केंद्र निर्मितीसाठी प्रस्ताव – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
Summary
अमरावती, दि. 22 : औद्योगिक क्षेत्र विकसित होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा चांदूरबाजार या शहरात आहेत. नरखेड रेल्वेमार्ग, तोंडगाव औद्योगिक क्षेत्रलगत असल्यामुळे याठिकाणी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे, त्यासोबतच शिरजगाव कसबा, कुरळपूर्णा, घाटलाडकी, बेलोरा याठिकाणी ग्रामाद्योग केंद्रातून औद्योगिक विकास […]
अमरावती, दि. 22 : औद्योगिक क्षेत्र विकसित होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा चांदूरबाजार या शहरात आहेत. नरखेड रेल्वेमार्ग, तोंडगाव औद्योगिक क्षेत्रलगत असल्यामुळे याठिकाणी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे, त्यासोबतच शिरजगाव कसबा, कुरळपूर्णा, घाटलाडकी, बेलोरा याठिकाणी ग्रामाद्योग केंद्रातून औद्योगिक विकास साधता येईल. त्यामुळे ग्रामोद्योग केंद्राचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, असे निर्देश जलसंपदा, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी दिले.
चांदूरबाजार येथील औद्योगिक क्षेत्राचा विकास आणि तोंडगाव येथील औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत विश्राम भवन येथे बैठक पार पडली. यावेळी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजाराम गुठळे, सहायक कामगार अधिकारी प्रशांत महाले, राहुल काळे, अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदिपकुमार अपार, चांदूरबाजारचे तहसिलदार अक्षय मंडवे उपस्थित होते.
‘नाविन्यपूर्ण’मधून ग्रामोद्योग केंद्र
ग्रामाद्योग केंद्र निर्मितीसाठी नाविण्यपूर्ण योजनेतून निधी प्रस्तावित करण्यात यावा, यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद औद्योगिक विकास महामंडळ आणि जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात यावी. अचलपूर औद्योगिक क्षेत्राकरिता संपादित जमिनीवर महामंडळाने आराखडा विकसित केला आहे. या क्षेत्रात 106 भूखंडाचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी 63 भूखंडाचे वाटप केले आहे. वाटप केलेल्या 11 भूखंडावर प्रत्यक्ष उत्पादन सुरु झाले आहे. उर्वरित 52 भुखंडाबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. कडू यांनी यावेळी दिले.