BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

पालकमंत्र्यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना खावटी अनुदान किटचे वाटप

Summary

चंद्रपूर,दि. 22 जुलै :  अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते खावटी अनुदान किटचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प […]

चंद्रपूर,दि. 22 जुलै :  अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते खावटी अनुदान किटचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथील आदिवासी आश्रमशाळेत करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रादेशिक व्यवस्थापक श्री. कोटलावार, सिंदेवाहीचे तहसीलदार श्री. सोनवणे, संवर्ग विकास अधिकारी भस्मे, जि.प.सदस्य रमाकांत लोधे, रुपा मसराम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. बावणे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, सुरवातीला कर्ज स्वरुपात असलेली ही योजना बंद होती. आता मात्र राज्य शासनाने आदिवासींसाठी दोन टप्प्यात ही योजना सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात लाभार्थ्यांच्या खात्यात 50 टक्के अनुदान अंतर्गत दोन हजार रुपये तर दुस-या टप्प्यात उर्वरीत 50 टक्के अनुदान अंतर्गत किराणा साहित्याची किट देण्यात येत असल्यामुळे  कोरोनाच्या काळात आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला आहे. आदिवासी बांधवांनी कोणत्याही समस्यांना न घाबरता आनंदमय जीवन जगावे. त्यासाठी सरकार आपल्या पाठिशी आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना अन्नधान्य किट तसेच कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या आदिवासी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी श्री. घुगे यांनी सांगितले की, चंद्रपूर प्रकल्प कार्यालयांतर्गत खावटी अनुदानासाठी एकूण 22770 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 21172 अर्ज मंजूर करण्यात आले आहे. मंजूर अर्जापैकी 20601 लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहे. तर उर्वरीत लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. सिंदेवाही तालुक्यांतर्गत एकूण 3684 लाभार्थी मंजूर असून त्यांना जीवनावश्यक वस्तु, अन्नधान्य किट वाटप करण्यात येईल, असे ते म्हणाले.

यावेळी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत सिंदेवाही तालुक्यातील 15 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डी. के. जांभुळे यांनी केले तर आभार एस.सी. डोंगरे यांनी मानले. यावेळी विस्तार अधिकारी श्री. मडकाम, श्री. गेडाम, आश्रमशाळेचे प्राचार्य श्री. चन्नुरवार, मंगेश पुट्टावार यांच्यासह आश्रमशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

नागभीड येथेही 50 लाभार्थ्यांना खावटी अनुदान किटचे वाटप : नागभीड पंचायत समितीच्या सभागृहात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते 50 लाभार्थ्यांना खावटी अनुदान किटचे वाटप करण्यात आले. यावेळी चिमुर आदिवासी विकास प्रकल्प्‍ कार्यालयाचे प्रकल्प्‍ अधिकारी के.ई. बावनकर, नागभीडचे तहसीलदार श्री. चव्हाण, गटविकास अधिकारी कोचरे, पंचायत समिती सभापती प्रफुल्ल्‍ खापर्डे यांच्यासह परिसरातील सरपंच उपस्थित होते.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *