महाराष्ट्र सांगली हेडलाइन

पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी येथील पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री यांनी केली पाहणी

Summary

सांगली, दि. २६, (जि. मा. का.) : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार फटका बसतो अशा घरांचे सर्व्हेक्षण करा. पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. […]

सांगली, दि. २६, (जि. मा. का.) : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार फटका बसतो अशा घरांचे सर्व्हेक्षण करा. पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अरूण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम आदि मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळवाडी येथील पूरग्रस्त निवारा केंद्राला भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे? याची त्यांच्याकडून माहिती घेतली. तसेच भिलवडी गावातील पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी भिलवडी व पंचक्रोशी गावातील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या.

भिलवडी बाजारपेठेची बोटीतून पाहणी, कवलापूर निवारा केंद्राला भेट

भिलवडी येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम व अन्य मान्यवर समवेत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिरज तालुक्यातील कवलापूर येथील नेहरू हायस्कूल मध्ये पूरग्रस्तांसाठी सुरू करण्यात आलेल्या निवारा केंद्रास भेट देवून या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली.

सांगली शहरातील स्टेशन चौक व दामाणी हायस्कूल येथे निवारा केंद्रास भेट

पुराने बाधित झालेल्या सांगली शहरातील स्टेशन चौक परिसराला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. स्टेशन चौक परिसरातील स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगली शहराला वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरुपी उपाय योजना राबविण्याबाबत चर्चा केली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता मिलींद नाईक उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पूरपरिस्थिती नियंत्रण करण्यासाठी धरणक्षेत्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य पध्दतीने नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पूरग्रस्तांचे तातडीने प्रशासनामार्फत स्थलांतरण करून त्यांना सुरक्षित ठिकाणी निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. या केंद्रामध्ये अन्न, पाणी याची मोफत सोय करण्यात आली आहे.

सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, पलूस तालुक्यातील जवळजवळ 22 गावे पूराने सातत्याने प्रभावित होतात. व्यापार, बाजारपेठ मधील व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेती, पिके, व्यापार यांचे नुकसान झाले असून बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यातील काही गावे पूररेषेत येतात त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे सांगून पूरग्रस्ताना मदत करावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *