BREAKING NEWS:
अहमदनगर महाराष्ट्र हेडलाइन

अधिक गतीने लसीकरण होण्याची गरज – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

Summary

अहमदनगर: जिल्ह्यात अद्यापही दैनंदिनरित्या साधारणता तीनशे ते पाचशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्ण आढळून येत असलेल्या भागात कडक उपाययोजना कराव्यात तसेच लसीकरण मोहिम अधिक गतीने राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. याबाबत राज्य पातळीवर पाठपुरावा करुन […]

अहमदनगर: जिल्ह्यात अद्यापही दैनंदिनरित्या साधारणता तीनशे ते पाचशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्ण आढळून येत असलेल्या भागात कडक उपाययोजना कराव्यात तसेच लसीकरण मोहिम अधिक गतीने राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. याबाबत राज्य पातळीवर पाठपुरावा करुन जिल्ह्यासाठी लशीचा अधिक पुरवठा होईल, याबाबत लक्ष घालू असे त्यांनी स्पष्ट केले.

 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज महसूलमंत्री श्री. थोरात यांनी कोरोना उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके,  अहमदनगर महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींची उपस्थिती होती.

यावेळी श्री. थोरात यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. संभाव्य लाट रोखण्यासाठी जे जे आवश्यक उपाय आहेत, त्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे. त्याचबरोबर ज्या भागात रुग्ण आढळून येत आहेत, तेथील कारणे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना त्याठिकाणी तात्काळ केल्या जाणे आवश्यक आहे. सध्या दुसऱ्या लाटेतही काही तालुक्यात अद्यापही रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. ही चिंतेची बाब आहे. जिल्हा प्रशासनाने त्याठिकाणी सर्वेक्षण करुन बाधितांना शोधून संपर्क साखळी तोडण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर, जिल्ह्यात सध्या लसीकरणाचा वेग काहीसा कमी आहे. केंद्र सरकारकडून लशीचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही, ही वस्तुस्थिती असली तरी प्राप्त झालेल्या लसींचे योग्य नियोजन करुन त्याचा वेग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा काही प्रमाणात तुटवडा जाणवला होता. संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल यादृष्टीने जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहितीही श्री. थोरात यांनी घेतली. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसोबतच मेडीकल ऑक्सिजन साठवणूकीसाठी व्यवस्था निर्माण करण्याचे काम जिल्ह्यात होत आहे. संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला जाईल, याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी, महसूलमंत्री श्री. थोरात यांना जिल्हा प्रशासन करीत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *