शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून व्हेंटिलेटर्स; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण
Summary
अमरावती, दि. 10: शहरांप्रमाणेच चांगल्या आरोग्य सुविधा ग्रामीण भागातही असाव्यात यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचा महाविकास आघाडी शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून जिल्हा आरोग्य यंत्रणेला व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. संभाव्य तिस-या लाटेला थोपविण्यासाठी आरोग्य […]
अमरावती, दि. 10: शहरांप्रमाणेच चांगल्या आरोग्य सुविधा ग्रामीण भागातही असाव्यात यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचा महाविकास आघाडी शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून जिल्हा आरोग्य यंत्रणेला व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. संभाव्य तिस-या लाटेला थोपविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून प्राप्त आठ व्हेंटिलेटर यंत्रणेचे लोकार्पण मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते नियोजनभवनात झाले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार किरण सरनाईक, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सुनील खराटे, राजेश वानखडे, श्यामजी देशमुख, दिलीप धर्माळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले की, आरोग्य यंत्रणा, विविध विभाग, संस्था व नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आपण दुसरी लाट थोपवू शकलो. आता तिसरी लाट येऊ नये यासाठी सजग प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आवश्यक यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे. उत्कृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर्स जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या यंत्रणेचा ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू रूग्णांसाठी उपयोग व्हावा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. लोकार्पण सोहळ्यानंतर मंत्री महोदयांनी पत्रकार बांधवांशीही संवाद साधला.