राज्यात जूनमध्ये १५ हजार ३३६ बेरोजगारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई, दि. ०७ : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात जून २०२१ मध्ये १५ हजार ३३६ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.
अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते जूनअखेर ७८ हजार ३९१ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
मंत्री श्री.मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.
नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी
विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९० हजार २६० इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
मुंबईत जूनमध्ये ६ हजार ३३० बेरोजगारांना रोजगार
मंत्री श्री. मलिक म्हणाले की, माहे जून २०२१ मध्ये विभागाकडे ३३ हजार ३२९ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ९ हजार १०९, नाशिक विभागात ६ हजार ५९४, पुणे विभागात ९ हजार ६०४, औरंगाबाद विभागात ५ हजार १४१, अमरावती विभागात १ हजार २९४ तर नागपूर विभागात १ हजार ५८७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
माहे जूनमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १५ हजार ३३६ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ६ हजार ३३०, नाशिक विभागात ३ हजार १११, पुणे विभागात ४ हजार ०७८, औरंगाबाद विभागात १ हजार ६५२, अमरावती विभागात ७९ तर नागपूर विभागात ८६ इतके बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळाली.