BREAKING NEWS:
पर्यावरण महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

कोरोना संकटाच्या कालावधीत पोलिसांचे योगदान मोलाचे – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

Summary

मुंबई, दि. 2 : – कोरोना काळात आपण घरात असताना पोलीस बांधव आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर कार्यरत आहेत. कोरोना संकटाच्या कालावधीत पोलिसांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या परिवाराकरिता काही करणे हे आपले कर्तव्यच असून त्यांच्यासाठी लसीकरण शिबीर म्हणजे त्यांचे आभार मानण्याची संधी […]

मुंबई, दि. 2 : – कोरोना काळात आपण घरात असताना पोलीस बांधव आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर कार्यरत आहेत. कोरोना संकटाच्या कालावधीत पोलिसांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या परिवाराकरिता काही करणे हे आपले कर्तव्यच असून त्यांच्यासाठी लसीकरण शिबीर म्हणजे त्यांचे आभार मानण्याची संधी आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

मुंबई पोलिसांच्या कुटुंबियांसाठी चेंबूर येथे आयोजित लसीकरण शिबिराचे उद्घाटन श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी उपस्थित होते. श्रीमती तारादेवी फाउंडेशन, एस.एस.हॉस्पिटल आणि ग्रीन एकर्स अकॅडमी यांच्या सौजन्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

पर्यावरणमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना काळात वैद्यकीय पथक, महानगरपालिका, शासकीय यंत्रणा याबरोबरच पोलीस दलानेही मोलाची भूमिका बजावली आहे. कोरोना संकटाच्या काळातही पोलीस दल मात्र रस्त्यावर सेवा बजावत आहेत. अनेक दिवस त्यांना घरी जाता आले नाही. त्यांच्या परिवारासाठी लसीकरण ही त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे. शक्य तेथे पोलिसांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण शिबिर आयोजित केले जाणार असून पोलिसांचे विविध प्रश्न सोडविण्याला शासनाचे प्राधान्य असल्याचेही श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

कोरोना काळात पोलीस दलातील प्रत्येकजण गरजूंसाठी देवाप्रमाणे धावून आल्याची भावना खासदार शेवाळे यांनी यावेळी व्यक्त केली. तर या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी पोलीस दल तत्पर असल्याचे सांगून नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त श्री. नगराळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *