BREAKING NEWS:
बुलडाणा महाराष्ट्र हेडलाइन

दिव्यांग बांधवांना ‘ई-ट्रायसायकल फिरते विक्री केंद्रा’चे वितरण पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव यांच्याहस्ते प्रतिनिधीक स्वरूपात चावीचे वितरण

Summary

व्यवसायासाठी साधने देऊन रोजगार निर्मिती होणार बुलडाणा,(जिमाका) दि.1 : महिला आर्थिक विकास महामंडळातंर्गत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत मंजूर दिव्यांग महिला व कुटुंबीय सदस्यांकरिता ” ई-ट्रायसायकल फिरते विक्री केंद्र” चे वितरण आज 1 जुलै रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र […]

व्यवसायासाठी साधने देऊन रोजगार निर्मिती होणार

बुलडाणा,(जिमाका) दि.1 : महिला आर्थिक विकास महामंडळातंर्गत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत मंजूर दिव्यांग महिला व कुटुंबीय सदस्यांकरिता ” ई-ट्रायसायकल फिरते विक्री केंद्र” चे वितरण आज 1 जुलै रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांचेहस्ते करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात ट्राय साकलच्या चावीचे वितरण करण्यात आले. तसेच फित कापून फिरत्या विक्री केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी जि.प अध्यक्ष मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुमेध तायडे आदी उपस्थित होते.

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्रा द्वारे बचत गटातील दिव्यांग लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर सदर ट्राय सायकलचे वितरण करण्यात आले. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात एकूण 162 दिव्यांग व्यक्तींना रोजगार निर्मित होणार असून महाराष्ट्र राज्यात प्रथमच अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणाद्वारे या उपक्रमाला 1 कोटी 11 हजार 600 रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. सदर उपक्रमामुळे या दिव्यांग लाभार्थींना रोजगार निर्मिती होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. रोजगार निर्मितीसह उत्पन्नात वाढ या प्रमुख उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. किमान 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या लाभार्थींना यात प्राधान्य देण्यात आलेले आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा समन्वयक सुमेध तायडे यांनी प्रास्ताविकात दिली.

 

रब्बी हंगामातील पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव यांची उपस्थिती

कृषि दिनामित्ताने रब्बी हंगाम 2020-21 मधील पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांचेहस्ते करण्यात आला. यावेळी जि.प. अध्यक्ष मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, जि.प कृषि व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, कृषि विकास अ‍धिकारी अनिसा महाबळे आदी उपस्थित होते.

रब्बी हंगामात पीक स्पर्धा आदिवासी गट व सर्वसाधारण गट अशा दोन गटात घेण्यात आली. हरभरा व गहू अशा दोन पीकांमध्ये जास्त हेक्टरी उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना यावेळी जिल्हा व तालुका स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देवून सन्मानीत करण्यात आले. आदिवासी गटात हरभरा पिकासाठी हेक्टरी 39 क्विंटल उत्पादन घेणारे टिटवी ता. लोणार येथील शेतकरी संजय ज्ञानेश्वर चिभडे व  हेक्टरी 32 क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी भगवान आश्रुजी कोकाडे यांना अनुक्रमे विभाग स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांकाने सन्मानीत करण्यात आले. तसेच सर्वसाधारण गटात हरभरा पिकासाठी  विमलताई विजयराव टापरे ता. जळगांव जामोद प्रथम, विठ्ठल पंढरी पोफळे ता. लोणार द्वितीय व विजयकुमार पुंजाजी अंभोरे ता. चिखली यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यचप्रमाणे सर्वधारण गटात मेहकर तालुक्यातून हरभरा पिकामध्ये हेक्टरी 30 क्विंटल 10 किलो उत्पादन घेतल्यामुळे खासदार प्रतापराव जाधव यांचा प्रथम क्रमांक आला. त्यामुळे त्यांनाही प्रशस्तीपत्र पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते देण्यात आले.

त्याचप्रमाणे आदिवासी गटात जिल्हास्तरावर हरभरा पिकासाठी वच्छला नारायण कोकाटे ता. लोणार प्रथम, लक्ष्मण महादु घाटे ता. लोणार द्वितीय व गोदावरी भगवान कोकाटे ता. लोणार यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. जिल्हास्तरीय सर्वसाधारण गटात गहू पिकासाठी वसुधा विजय चांगडे ता. मेहकर, रोहीत शरद ठाकरे ता. मेहकर व दिपाली गजानन फराटे ता. मेहकर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यांचाही  गौरव यावेळी करण्यात आला. यावेळी पीक स्पर्धेविषयी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी माहिती दिली.

 

गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा – पालकमंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे

अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे दिले आदेश

आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटखा विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातलेली असतांना देखील मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून गुटखा विक्री करणाऱ्या गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

स्थानिक विश्राम गृह येथे अमरावती विभागाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अमरावती विभागाचे सह आयुक्त अन्न एस जी अण्णापुरे , अकोल्याचे सहाय्यक आयुक्त एस डी तेरकर, अमरावती व यवतमाळचे सहाय्यक आयुक्त  के आर जयपूरकर, बुलडाणा सहायक आयुक्त एस डी केदारे यांच्यासह विभागातील सर्व अन्न सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अमरावती विभागात केलेल्या कारवायांचा आढावा मंत्री महोदयांनी घेतला.  त्यानंतर अमरावती, अकोला, बुलडाणा येथील गुटखा माफिया गुटख्याची तस्करी करून गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत. मध्यंतरी कोरोनामुळे याकडे विभागाचे दुर्लक्ष झाले. परंतु आता याकडे दुर्लक्ष होता कामा नये, गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा, अशा सूचना मंत्री श्री. शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

तसेच जनतेला हायजेनिक अन्न पदार्थ मिळावे यासाठी अन्न पदार्थ तपासण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. खवा, मिठाई यामध्ये प्रामुख्याने भेसळ होत असते त्याची देखील तपासणी करण्यात यावी. काही व्यावसायिक खाद्यपदार्थ तळण्यासाठी एकाच तेलाचा वारंवार वापर करतात. सदर तेलामध्ये तळलेले खाद्यपदार्थ खाल्यास ते शरीरासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे एकाच तेलाचा वारंवार वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाही करावी. किराणा दुकानाच्या देखील नियमित तपासण्या कराव्या. यामध्ये कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर यापुढे कारवाही करण्यात येईल असा इशारा मंत्री डॉ.शिंगणे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *