महिला व बालविकास योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळेल – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर महिला व बालविकास भवनाचे भूमिपूजन
अमरावती, दि. 28 : महिला व बालविकास योजना राबविणारी सगळी कार्यालये एकाच छताखाली येण्यासाठी भवनाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी महत्त्वाची सुविधा निर्माण होणार असून, योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
येथील गर्ल्स हायस्कुल परिसरात महिला व बालविकास भवनाचे भूमीपूजन करताना त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख अध्यक्षस्थानी होते. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते.
महिला व बालविकास उपायुक्त, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, राज्य महिला आयोग व महिला आर्थिक विकास महामंडळ आदी कार्यालये या भवनात एकाच छताखाली असतील. या भवनासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महिला आयोगाचे कार्यालय विभागीय स्तरावर सुरू करण्यात आले. ते कार्यालय देखील या इमारतीत असेल. महिला व बालविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा नियोजनात तीन टक्के तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कामांना चालना देण्यात येत असल्याचे मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.
नागरी भागातही कुपोषणाची समस्या आहे. अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. लोकप्रतिनिधी व विविध स्तरातील मान्यवर, नागरिकांनीही कुपोषित मुलांच्या संगोपनासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात यांनी प्रास्ताविक केले.