अनाथांसाठी शिधापत्रिकेचे वितरण
Summary
मुंबई, दि. 24 : अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरित प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभ देण्याबाबतचा शासन निर्णय २३ जून रोजी नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. २८ वर्षांवरील अनाथांना उत्पन्नाप्रमाणे अनुज्ञेय शिधापत्रिका व त्यावरील लाभ देण्यात येईल. संस्थेमध्ये […]
मुंबई, दि. 24 : अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरित प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभ देण्याबाबतचा शासन निर्णय २३ जून रोजी नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.
२८ वर्षांवरील अनाथांना उत्पन्नाप्रमाणे अनुज्ञेय शिधापत्रिका व त्यावरील लाभ देण्यात येईल. संस्थेमध्ये असलेल्या अनाथांना कल्याणकारी संस्था व वसतीगृहे योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ देण्यात येतो. त्यामुळे हे लाभ संस्थेमध्ये असणाऱ्या अनाथांना अनुज्ञेय असणार नाहीत. अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरित केलेले प्रमाणपत्र किंवा आई व वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
ओळखपत्र म्हणून आधारकार्ड, बँक पासबुक, बालगृह, निरीक्षणगृह, अनुरक्षणगृह इ. संस्था बाबतीत त्या संस्थेच्या अधीक्षकांचे संस्थेत वास्तव्य केल्याबाबतचे प्रमाणपत्र यापैकी कोणता एक पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. रहिवासासंदर्भात शहरी भागात नगरसेवक व ग्रामीण भागात सरपंच अथवा उपसरपंच यांचे त्या भागातील रहिवाशी प्रमाणपत्र ग्राह्य असतील. बहुतांशी अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत उत्पन्नाबाबत स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळ उपलब्ध असून त्याचा सांकेतांक २०२१०६२३१६१५४२९५०६ असा आहे.