केंद्रातील मोदी सरकार इंग्रज राजवटीपेक्षाही जुलमी, अत्याचारी !: नाना पटोले तीन काळ्या कृषी कायद्यांचे फैजपूरच्या ऐतिहासिक भूमित प्रतिकात्मक दहन. शेतक-यांशी संवाद साधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उत्तर महाराष्ट्र दौ-याला सुरुवात
फैजपूर, जळगाव, दि. २३ जून २०२१
केंद्रातील मोदी सरकार हे इंग्रज राजवटीपेक्षा जुलमी व अत्याचारी आहे. हे सरकार शेतकरी, कष्टकरी विरोधी असून शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवून देशोधडीला लावण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी तीन काळे कृषी कायदे आणले आहेत. केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार घालवल्याशिवाय या देशातील शेतकरी कष्टकरी यांचे अच्छे दिन येणार नाहीत अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन ज्या फैजपूर येथे झाले तेथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांचे दहन करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या उत्तर महाराष्ट्र दौ-याची सुरुवात केली. यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पांडे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, डॉ. उल्हास पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील, प्रमोद मोरे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील अत्याचारी मोदी सरकारला शेतकऱ्यांसाठी वेळ देता येत नाही. तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सात महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनात ४०० शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी या शेतकऱ्यांची साधी भेटही घेतली नाही. शेतकरी थंडी, पाऊस, उन्हात आंदोलन करत असताना पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाऊन प्रचारात व्यस्त होते. हे जुलमी कायदे रद्द झालेच पाहिजेत अशी काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी संसदेत तसेच संसदेच्या बाहेर रस्त्यावरही भाजपाच्या जुलमी सरकारविरोधात लढा देत आहे आणि यापुढेही देत राहू. जनतेचे हित हेच काँग्रेससाठी सर्वात महत्वाचे आहे.
देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह, सोनियाजी, राहुलजी यांनी कोरोना संदर्भात महत्वाचे सल्ले दिले होते. परंतु त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही याची किंमत देशाला हजारो बळी देऊन मोजावी लागली आहे. कालच राहुलजी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल इशारा देत योग्य ती पावले उचलण्याची मागणी केली आहे. मागील दोन लाटेत मोदी सरकारच्या अक्षम्य चुकांमुळे निष्पाप लोकांचे बळी गेले. आतातरी सरकारने जागे व्हावे आणि वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे नाना पटोले म्हणाले.
मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळात देशात अनागोंदी वाढली आहे. पीक वीमा योजनेतूनही शेतकऱ्यांना लुटले जात आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल मोठ्या प्रमाणात महाग झाले आहे, बरोजगारी वाढली आहे याविरोधात काँग्रेस लढा देत आहे. कोरोना संकटामुळे मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्यास बंधने आहेत मात्र काँग्रेसने कोरोनाचे नियम पाळून मोदी सरकारच्या विरोधात आंदोलने केली आहेत आणि पुढेही करत राहू. मोदी सरकारच्या काळात फक्त त्यांच्या मूठभर उद्योगपती मित्रांनाच लाभ झाला असून सर्वसामान्य जनता बेहाल झाली आहे. २०२४ च्या निवडणुकीत जनता भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल.
जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाना पटोले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला तसेच कोरोना सेंटरला भेटी दिल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व शेतक-यांनी जागोजागी पटोले यांचे स्वागत केले.