BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ पर्यावरण भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

Sunflag स्टील कंपनीमुळे वरठी व एकलारी गावांमध्ये भीषण प्रदूषण; ग्रामस्थ त्रस्त

Summary

प्रतिनिधी वरठी:-             भंडारा जिल्ह्यातील वरठी आणि एकलारी या गावांमध्ये स्थित Sunflag Iron & Steel Company Limited मुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाचा गंभीर परिणाम स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर होत असून ग्रामस्थ प्रचंड संतप्त आहेत. कंपनीच्या धुरंडी व प्रक्रियेतील उत्सर्जनामुळे प्रचंड प्रमाणात काळसर […]

प्रतिनिधी वरठी:-
            भंडारा जिल्ह्यातील वरठी आणि एकलारी या गावांमध्ये स्थित Sunflag Iron & Steel Company Limited मुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाचा गंभीर परिणाम स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर होत असून ग्रामस्थ प्रचंड संतप्त आहेत. कंपनीच्या धुरंडी व प्रक्रियेतील उत्सर्जनामुळे प्रचंड प्रमाणात काळसर धूळ व धूर गावांमध्ये पसरत आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, त्वचेचे आजार आणि सततच्या खोकल्याचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कंपनीचे धूर नियंत्रण यंत्र सुरळीत काम करत नाहीत. त्यामुळे धुरांमध्ये हवेचे प्रदूषण नियंत्रणापलीकडे गेले आहे. या प्रदूषणावर ग्रामपंचायत वरठी तसेच स्थानिक प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही, हे विशेष लक्षवेधी आहे.

जनहित याचिकेची नोंद

प्रदूषणाच्या विरोधात Dr. Babasaheb Ambedkar Multipurpose Yuwa Sanstha, वरठी या संस्थेने नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये Sunflag कंपनी व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे की, गेल्या 20 वर्षांपासून गावकरी या प्रदूषणाने त्रस्त आहेत व 500 हून अधिक रहिवासी आरोग्याच्या विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. या प्रदूषणामुळे अनेक मृत्यूही झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

कंपनीचे उत्तर आणि प्रत्यक्ष वास्तव

Sunflag कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या अहवालांनुसार प्रदूषण नियंत्रणासाठी विविध यंत्रणा – इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर (ESP), बॅग फिल्टर्स, आणि फ्यूम एक्स्ट्रॅक्शन सिस्टीम – कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात या उपायांमुळे गावात कोणताही फरक जाणवत नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांची मागणी

ग्रामस्थांनी मागणी केली आहे की कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार त्वरित तपासणी होऊन प्रदूषण नियंत्रणाचे उपाय काटेकोरपणे राबवण्यात यावेत. अन्यथा कंपनी विरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *