BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

५० हजार वृक्षांना पालकत्व देऊन ‘वृक्ष चळवळ’ निर्माण करणारा अवलिया…!

Summary

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्यावतीने देण्यात येणारा मानाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार – 2019’ हा कोपरगाव येथील वृक्ष व पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांना जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय दुसरा तर नाशिक विभागाचा प्रथम अशा दोन पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे. अशा […]

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्यावतीने देण्यात येणारा मानाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार – 2019’ हा कोपरगाव येथील वृक्ष व पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांना जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय दुसरा तर नाशिक विभागाचा प्रथम अशा दोन पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे. अशा या पर्यावरण दुताच्या वृक्ष संवर्धन कार्याचा परिचय…

मागील काही दशकांपासून  पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे तापमानातील वाढ आणि ग्लोबल वार्मिंगचा होणारा विपरित परिणाम याने साऱ्या जगाला चिंताग्रस्त केले आहे. अशा काळात जैविक विविधतेने नटलेली सृष्टी जतन करुन तिचे संवर्धन करणे काळाची गरज झाली आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यात वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन, विविध स्पर्धा, जनजागृती असे उपक्रम शासनपातळीवर सुरु असतात. मात्र लोकसहभागातून या अभियानाला बळ मिळाले तर अनेक अशक्य गोष्टी सहज शक्य होतांना दिसतात. अशाच विविध उपक्रमांना लोकसहभागाची जोड देत अनोखी वृक्ष चळवळ उभे करण्याचे काम वृक्षप्रेमी सुशांत घोडके या अवलिया तरूणाने केले आहे.

आजवर असंख्य वृक्षांना जगवणारा हा अवलिया झाडांसाठी रात्रंदिवस तत्पर असतो. कोपरगाव व शिर्डी परिसरातील 79 गावांमध्ये शाळा, ग्रामपंचायती, पाड्या-वस्त्यांमध्ये त्याने सुरू केलेल्या वृक्ष चळवळीमुळे 50 हजार वृक्षांचे पालकत्व घेण्यासाठी विद्यार्थी व ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत. त्याच्यांच मार्गदर्शन व प्रेरणेने पुणतांब्यासारख्या अनेक गावांत पर्यावरण संवर्धनाच्या कामाने उभारी घेतली आहे.

शिर्डी उपविभागातील ग्रामीण भागासह कोपरगाव शहर आणि ग्रामीण भागातील 79 गावात यांचे कार्य पहावयास मिळते. अनेक शाळांमध्ये वृक्षारोपण करुन त्यांचे जतन केले आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती करत वृक्षारोपण आणि पालकत्व अभियान यशस्वीपणे राबविले आहे.”एक व्यक्ती-एक झाड-एक पालक” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात आली असून सुमारे 50 हजारांच्या पुढे रोपांचे वितरण, रोपण आणि पालकत्व दिले आहे.

वृक्षारोपणाअंतर्गत नारळ, कडूनिंब, वड, पिंपळ, बेल, गुलमोहर, आवळा, कौठ, शिरस, कांचन, हादगा, बकान, रेन ट्री, कन्हेर, यासह आंबा, चिकू, पेरु, बदाम, सीताफळ, तुळस यासह दुर्मिळ जंगली, आयुर्वेदिक वनस्पती अशा अनेक वृक्षांचे रोपण करुन त्यांना पालकत्व दिले आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राज्यव्यापी वन महोत्सवाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र हरित सेना’ सदस्य नोंदणी अभियानात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. मोफत रोप वितरण, वितरित रोपांचे रोपण आणि पालकत्व जागृती आणि कृतीशील उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्था, संघटना यांचा व्यापक सहभाग मिळवून दिला आहे.

श्री गणेश सार्वजनिक उत्सवादरम्यान किमान 11 झाडे आणि तीन वर्ष पालकत्व स्विकारणाऱ्या संघटनांचा सन्मान करण्याची अभिनव संकल्पना त्यांनी राबविली. या उपक्रमास सार्वजनिक उत्सव मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वन महोत्सव, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत अनेक उपक्रम ते नेहमी राबवितात. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘वृक्षसंवर्धन’ आज्ञापत्र, सहभाग प्रमाणपत्र सोबत दिले जाते. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कचरा कुंड्या, काटेरी झुडपे हटवून तेथे वृक्षारोपण आणि सुशोभीकरण केले आहे.

राहाता तालुक्यातील पुणतांबा गावाला राज्य व विभागीय ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सुरुवातीच्या काळात या गावला वृक्षारोपण आणि संवर्धनाची गोडी लावत रोप उपलब्ध करून देत वृक्षारोपण अभियानाची मुहुर्तमेढ रोवली. आज हा आनंदोत्सव साजरा करतांना पुणतांबेकर वनश्री सुशांत घोडके यांचे ऋण व्यक्त करतात. शाळांची मैदाने, वसतीगृहे, सार्वजनिक बगीचा आरक्षित जागा, रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले आहे. वनमहोत्सव, पर्यावरण दिन निमित्ताने वृक्ष दिंडी, जनजागृती फेरी, राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी  ग्रामीण विद्यार्थ्यांना स्वच्छता – जलशक्ती – वृक्षारोपण आणि पर्यावरण यावर मार्गदर्शन केले आहे.

पुरस्काराबाबत आपल्या भावना व्यक्त करतांना सुशांत घोडके म्हणाले, ‘‘ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने दिलेला वनश्री पुरस्कार हा माझ्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येक वृक्ष व पर्यावरण प्रेमींचा हा सन्मान आहे. माझ्या सार्वजनिक कार्यात साथ देणारे माझे आई- वडील, कुटुंबीय, वृक्ष मित्र, ज्ञात – अज्ञात घटक, पर्यावरण प्रेमी नागरिक, शिर्डी उपविभागासह कोपरगांव तालुकावासियांना हा पुरस्कार समर्पित आहे. ’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *