१९७१ च्या युद्धातील विजयोत्सवानिमित्त ‘स्वर्णिम विजय मशाली’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत
मुंबई, दि. 1 : भारताने १९७१ मधील पाकिस्तान विरोधातील युद्धात मिळविलेल्या विजयानिमित्त काढण्यात आलेल्या ‘स्वर्णिम विजय मशाली’चे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गेट-वे-ऑफ इंडिया येथे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. ही मशाल दिल्ली येथून जैसलमेर, द्वारका, वडोदरा असे साडेचार हजार किमीचे अंतर पार करुन आज मुंबईत दाखल झाली.
यावेळी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भुसे, गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच लेफ्टनंट जनरल एस.के. प्राशर, एअर व्हॉईस मार्शल एस.आर. सिंग, वेस्टर्न नेव्हल कमांडचे व्हॉईस ॲडमिरल आर.हरिकुमार यांच्यासह तिन्ही दलांचे अधिकारी उपस्थित होते.
भारताने पाकिस्तानला १९७१ च्या युद्धात नमवले होते. या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त देशभर ‘स्वर्णिम विजय वर्ष” साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त स्वर्णिम विजय मशालीची देशभर परिक्रमा सुरु आहे. या स्वर्णिम विजय मशालीचे आज 1 सप्टेंबर रोजी मुंबईत आगमन झाले.
सन १९७१च्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या चक्र पुरस्कारार्थी ॲडमिरल लक्ष्मीनारायण रामदास, ॲडमिरल विजयसिंग शेखावत, विंग कमांडर दिनेशचंद्र नायर, नायक धोंडिराम बनसोडे, वीरपत्नी श्रीमती सेलडा डायस यांना मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. भारतीय लष्कराच्या वाद्यवृंद पथकाने यावेळी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.